बिलासाठी पोलीस पत्नीची अडवणूक; खाजगी रुग्णालयांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:54 AM2020-05-30T01:54:08+5:302020-05-30T01:54:46+5:30
महापालिकेच्या नियमावलीस दाखवली जाते केराची टोपली
ठाणे : खाजगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करून त्यांनी किती बिल आकारावे, याबाबत ठाणे महापालिकेने स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयांनी महापालिकेच्या नियमावलीस खाडीत बुडवून रुग्णांची लूट सुरूच ठेवली आहे. आधी बिल भरा मगच घरी सोडू, असा दम भरुन घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयाने मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीची अडवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांकडून होणाºया लुटीचे अनेक प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खाजगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करण्याचे सूचित केले. यात प्रत्येक दिवसाचे किती बिल आकारावे, याचे निर्देशही दिले. परंतु, महापालिकेने अद्यापही कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नसल्याचे या रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे. त्यातही एखादा रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाला तर आधी ५० हजार भरा, मगच तुम्हाला दाखल केले जाईल, असा दमही भरला जात आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलिसाच्या पत्नीलादेखील या रुग्णालयाचा वाईट अनुभव आला. पाच दिवसांनंतर लगेचच त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज दिला. परंतु, हाती ८० हजारांचे बिल दिले.
या पाच दिवसांच्या कालावधीत व्यवस्थित विचारपूसही केली नाही, थोडी औषधे दिली. घरी जाण्यापूर्वी पुन्हा चाचणी करा, अशी विनंती केल्यावर त्याची गरज नसल्याचे सांगून बेड रिकामा करण्याच्या सूचना दिल्या, असा आरोप या पोलीस पत्नीने केला आहे. शिवाय, बिल भरत नाही, तोपर्यंत सोडणार नसल्याचे सांगितल्यावर मी पोलिसाची पत्नी आहे, किमान थोडा वेळ थांबा तरी, अशी विनंतीही केली. तरीही, पायºयांवर बसवून पैसे मागितल्याने स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याशी या महिलेने संपर्क साधला. परंतु, त्यांनाही रुग्णालयाने जुमानले नाही. अखेर, पैसे भरल्यानंतर रात्री उशिरा त्यांना घरी सोडले.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जात असल्याचे वेगवेगळ्या घटनांवरून दिसते. रुग्णांची पैशांसाठी अडवणूक करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. याचा फटका पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनाही सोसावा लागत आहे. यंत्रणेकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने त्यातून रुग्णवाहिका तसेच शववाहिकांचा अभाव, रुग्णांसाठी सुविधांचा अभाव, अशा विविध समस्या उद्भवत आहेत.
मुंबई पोलीस दलातील कर्मचाºयाच्या पत्नीने पाच दिवस उपचार घेतल्यानंतर, तिची कोरोनाची चाचणी न करताच घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. बेडवरून उतरवून त्यांना पायºयांवर बसवले आणि पैसे भरल्यावरच घरी सोडले जाईल, एक दिवस वाढला तरी त्याचेही पैसे भरावे लागतील, असा दम दिल्याने संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिली.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढत असल्याने ठाण्यात शववाहिकांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे एकीकडे कुटुंबातील व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेल्याचे दु:ख सहन करणाºया नातलगांना, दुसरीकडे शववाहिकेसाठी ताटकळत बसावे लागले. शववाहिकांसाठी लागणारे कर्मचारीही अपुरे आहे. जिथे १५ कर्मचाºयांची गरज आहे, तिथे फक्त १० कर्मचारी असल्याने मृतांच्या नातेवाइकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.