पोलीस ऐकणार महिलांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:53 PM2019-12-17T23:53:07+5:302019-12-17T23:53:16+5:30
व्हॉट्सअॅपद्वारे अर्जांचे केले वितरण : तरुणीच्या अपघातानंतर आली जाग
अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : लोकलमधील गर्दीमुळे सोमवारी चार्मी पासड या युवतीचा बळी गेल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना जाग आली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानकातील महिला प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्याचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून एका अर्जाद्वारे समस्या मांडण्याचे आवाहन केले आहे.
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार म्हणाले की, आम्ही व्हॉट्सअॅपद्वारे महिलांना अर्जांचे वाटप केले आहे. त्यात रेल्वे प्रवासात येणाºया अडचणी, रेल्वे आणि पोलिसांकडून अपेक्षा, मागण्या, असा तपशील महिला प्रवाशांनी आपले नाव, पत्त्यासह भरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करायचा आहे. मंगळवारपासून लागलीच काही महिलांनी अर्ज भरून देण्यास सुरुवात केल्याचे ते पुढे म्हणाले.
डोंबिवली येथून सकाळी गर्दीच्या वेळेत स्वतंत्र महिला स्पशेल लोकल, १५ डब्यांच्या लोकल वाढवणे, महिलांचे डबे वाढवणे, सुरक्षारक्षक नेमणे, महिलांना रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानकात वाटणारी असुरक्षितता, पादचारी पूल व जिन्यांवर होणारी कुंचबणा, पुरुष प्रवाशांकडून होणारी चेष्टा, मस्करी, टीका टोमणे याला आळा घालावा, अशा मागण्या महिला प्रवाशांनी केल्या असल्याचे समजते. तसेच गर्दीच्या लोंढ्यापुढे पोलिसांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही महिलांनी नाराजीने केला असल्याची माहिती पुढे आली आहे. वाढत्या गर्दीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीही करत नाही. त्यामुळेच चार्मीचा सोमवारी मृत्यू झाला, असे काही महिला प्रवाशांनी सांगत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
डोंबिवलीतील रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. यावेळी महिलांना आपल्याला भेडसावणाºया समस्यांचा पाढा वाचला. त्यावर पोलिसांनी गर्दीमुळे समस्या वाढत आहेत. निदान अपघात कमी होण्यासाठी डोंबिवली स्थानकात गर्दीच्या वेळेत महिलांनी डब्यांसमोर रांग लावून लोकलमध्ये चढावे, असे आवाहन केले.
ठाणे, दादर, मुलुंड, कल्याण येथे हे प्रयोग यशस्वी झाले असून, त्यानुसार लोकलमध्ये प्रवेश मिळतो, आणि महिलांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होतो, असे त्यांनी सांगितले. दरवाजात उभे राहणाºया, लोकल डब्यात मधल्या पॅसेजमध्ये जागा असताना पुढे न सरकणाºया महिलांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर स्थानकातील महिला पोलिसांना यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिन्यांवरही आरपीएफ, होमगार्ड प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करत असल्याचे सांगण्यात आले. गर्दी असताना कामावर जाण्याची घाई असली तरी दरवाजात उभे राहून लटकून जीव धोक्यात घालू नका, असेही आवाहन पोलिसांनी केले.
दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना, सामाजिक संस्था आदींनीही पुढाकार घ्यावा आणि प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जागृती करावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. रेल्वे प्रवासात कुठेही गैरसोय, अडचणी आल्यास तातडीने हेल्पलाइनशी संपर्क साधावा, तातडीने मदत मिळेल, असेही आश्वासन यावेळी देण्यात आले.
चार्मीच्या कुटुंबीयांना करणार मदत
च् मध्य रेल्वे प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, चार्मी पासडच्या अपघाताची घटना दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडे मदतीचा अर्ज केल्यानंतर तातडीने त्यांना नियमाप्रमाणे अर्थसहाय्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
च् वाढते अपघात रोखण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अशा अपघातांमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे. आगामी काळात ते अपघातांचे प्रमाण आणखी घटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
च् लोकल प्रवासात फुटबोर्डवरून प्रवास करणाºया ४२० प्रवाशांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.