मीरा भाईदरमधील समुद्र-धबधबे आदी पर्यटनस्थळी गेल्यास पोलीस करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 02:28 PM2022-07-16T14:28:55+5:302022-07-16T14:33:29+5:30
Miraroad News : चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तीन तरुणांना अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते.
मीरारोड - उत्तन समुद्र किनारी जीवघेणी स्टंटबाजी व गर्दी तसेच चेणे येथे तीन तरुणांना नदी खोऱ्यातून वाचवण्यात आल्याच्या घटनांनंतर मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी हद्दीतील सर्व धबधबे, तलाव, धरणे व इतर पर्यटनस्थळांचे १ कि.मी. परिसरात व समुद्रकिनारी जाण्यास, मद्यपान, सेल्फी, प्रदूषण आदींना कलम १४४ जारी करत मनाई केली आहे.
पावसाळा सुरू झाला की शहरातील उत्तन समुद्र किनारा, भाईंदर ते घोडबंदरचा खाडी किनारा, चेणे येथील लक्ष्मी नदीपात्र तसेच डोंगरी-उत्तन व चेणे-काजूपाडा व काशीमीरा भागातील लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु निसर्गाचा निखळ आनंद लुटण्या ऐवजी मद्यपी, व्यसनी व बेजबाबदार उनाडांचा राबता हा ठिकाणी त्रासदायक व जीवघेणा ठरत आला आहे.
४ जुलै रोजी चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तीन तरुणांना अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते. वास्तविक या भागात नेहमीच मद्यपी व मौजमजेसाठी येणारे जीव गमावतात वा जीवघेण्या प्रसंगातून वाचवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. तर उत्तन समुद्र किनारी जीवघेण्या लाटा उसळत असताना समुद्रातील खडकावर स्टंटबाजी करणाऱ्या उनाडांना पोलिसांनी पिटाळले होते.
पोलिसांनी आता अशा घटनांचे गांभीर्य घेत जीवित व वित्त हानी रोहण्यासाठी सर्व धबधबे, तलाव, धरणे व इतर पर्यटनस्थळांचे १ कि.मी. परिसरात व समुद्रकिनारी फौजदारी प्रक्रियाचे कलम १४४ अन्वये पोलीस उपआयुक्त यांनी मनाई आदेश जारी केला आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या तसेच पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्या खाली बसण्यास, सेल्फी वा चित्रीकरण करणे, मद्यपान किंवा मद्यधुंद अवस्थेत जाणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत मद्य विक्री करण्यास बंदी घातली आहे.
रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे, अतिवेगाने चालवणे, ओव्हरटेक करण्यास मनाई केली आहे. खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर फेकणे. मोठ्या आवाजात गाणी - वाद्य, गाडीतील ध्वनी यंत्रणा वा डी .जे. सिस्टीम वाजवण्यावर बंदी असून ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कारवाई केली जाणार आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड, अश्लील हावभाव, शेरेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी करवीर केली जाणार आहे. १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे मनाई आदेश लागू राहणार असून सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.
वन हद्दीतल्या घुसखोरांवर कठोर कारवाई
काशीमीराच्या माशाचा पाडा व महाजन वाडी येथील अय्यप्पा मंदिर भागातून तसेच अन्य ठिकाणावरून संजय गांधी राष्ट्रीय वन हद्दीत अनेक जण पावसाळ्यात मौजमजेसाठी घुसखोरी करतात. वन विभाग सह पोलिसांनी या भागात करडी नजर ठेवली आहे. अशा घुसखोरांवर दंडात्मक कारवाई सह वेळ पडल्यास वन कायद्याखाली गुन्हे दाखल केले जातील असा इशारा वन अधिकारी मनोज पाटील यांनी दिला आहे.