भाईंदर पुर्वेच्या वारांगनांविरोधात पोलीस करणार संयुक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 07:41 PM2019-12-01T19:41:32+5:302019-12-01T20:18:30+5:30
कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा महापौरांचा इशारा
मीरारोड: भाईंदर पुर्वेला रेल्वे स्थानक परिसर व बाळाराम पाटील मार्गावरील वारांगनांच्या उपद्रवा विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेतला असतानाच दुसरीकडे महापौर डिंपल मेहता यांनी पोलीस अधिकारायांसह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व नागरीकांच्या बोलावलेल्या बैठकीत ठोस कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा पोलीसांना दिला आहे. तर पोलीसांनी देखील १५ दिवसां पासुन कार्यवाही सुरु असुन रेल्वे, नवघर व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखा असे संयुक्त पथक नेमले असल्याचे स्पष्ट केले.
भाईंदर पुर्वेच्या रेल्वे स्थानक परिसर व बाळाराम पाटील मार्गावर दिवस रात्र वेश्या व्यवसायसाठी वावरणाराया वारांगनां मुळे सर्वसामान्य नागरीकां मध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषत: महिला व मुलीं मध्ये मोठा रोष आहे. २२ नोव्हेंबर रोजीच शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता यांनी या प्रकरणी नवघर पोलीसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. तर शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या महिला आघाडीने रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करत वारांगनांना पीटाळुन लावले होते. रेल्वे व नवघर पोलीसांना निवेदन देऊन जन आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान महापौर डिंपल मेहता यांनी देखील २५ नोव्हेंबर रोजी नवघर पोलीसांना पत्र देऊन वारांगनांच्या जाचा प्रकरणी बैठकीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी महापौरांना पत्र पाठवुन ३० नोव्हेंबर रोजी गोडदेव नाका येथील खाजगी हॉल मध्ये सभा घेण्याचे म्हटले होते. शनिवारी झालेल्या सभेत महापौरांसह उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी आमदार नरेंद्र मेहता, पोलीस उपअधिक्षक शशीकांत भोसले, वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे निकम, भालसींग, निरीक्षक सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
वेश्या व्यवसाय करणाराया वारांगनांची समस्य गेल्या अनेक वर्षांपासुन आहे. या आधी देखील आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. पोलीसांनी हे कायमस्वरुपी बंद केले नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा महापौर डिंपल यांनी दिला.
शशीकांत भोसले यांनी, गेल्या १५ दिवसां पासुन सतत कार्यवाही सुरु असल्याचे सांगीतले. नवघर पोलीस कारवाईसाठी गेले की वारांगना रेल्वेच्या हद्दीत पळायच्या. त्यामुळे कारवाईसाठी नवघर पोलीस, रेल्वे पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेचे संयुक्त पथक तयार केले असुन रेल्वे स्थानक परिसरात सहाय्यता केंद्र सुरु केले जाणार आहे असे भोसले यांनी आश्वस्त केले.
उपमहापौरांना कोपऱ्यात तर माजी आमदारांना मानाचे स्थान देण्यावरुन तक्रारी
महापौरांनी सदर बैठक बोलावली असली तरी पोलीस अधिकारायांची उपस्थिती असल्याने प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता. महापौरांसह पोलीस अधिकारी, उपमहापौर चंद्रकांत वैती व्यासपीठावर होते. परंतु उपमहापौरांना शेवटी कोपरायात बसवण्यात आले होते. तर माजी आमदार नरेंद्र मेहता मात्र महापौर आणि उपअधिक्षक यांच्या मध्ये मध्यभागी बसले होते. मेहतांवर विविध गुन्हे दाखल असुन ते आता पदावर नाहित. तसे असताना पोलीसांनी उपमहापौरांना डावलुन मेहतांना स्थान कसे दिले ? असा सवाल करत या प्रकरणी पोलीसां विरोधात थेट शासनासह वरिष्ठ अधिकारायांकडे ब्रिजेश शर्मा, सुमित मोदी आदी नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत.