पोलीस पत्नी संघाचे ठाण्यात धरणे
By admin | Published: April 19, 2017 12:32 AM2017-04-19T00:32:20+5:302017-04-19T00:32:20+5:30
पोलिसाला आठ तासांची ड्युटी मिळावी... पोलिसांना मतदार संघ मिळावा... पुरूष पोलीस अंमलदारांना पत्नीच्या प्रसुतीनंतर बालसंगोपन व पालकत्व रजा म्हणून ४५ दिवस रजा मिळावी
ठाणे : पोलिसाला आठ तासांची ड्युटी मिळावी... पोलिसांना मतदार संघ मिळावा... पुरूष पोलीस अंमलदारांना पत्नीच्या प्रसुतीनंतर बालसंगोपन व पालकत्व रजा म्हणून ४५ दिवस रजा मिळावी या आणि आदी एकंदरीत २४ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ गेल्या दीड वर्षांपासून लढा देत आहे. मात्र, शासन त्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी ठाण्यात धरणे आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांसंदर्भाचे निवदेन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना संघाच्या शिष्टमंडळाने दिले. ते शासनापर्यंत पोहचविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या धरणे आंदोलनात ठाणे, मुंबईसह राज्यातील पोलीस पत्नी आणि त्यांची मुले सहभागी झाली होती.
पोलीस व त्याच्या कुटूंबियांवर होत असलेल्या अन्यायाबाबत कोणी लक्ष देत नाही. त्यातच महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या वतीने दीड वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यावेळी वरील मागण्यांसह पोलिसांना हक्काची घरे मिळावीत, विधवा पोलीस पत्नीस २ महिन्यात शासनाचे सर्व लाभ मिळावेत, पोलीस व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या आजारांवर वैद्यकीय सुविधा बिनशर्त व मोफत मिळावी, पोलिसांच्या एका मुलास पोलीस सेवेत सामावून घ्यावे, वरिष्ठांकडून होणारा नाहक त्रास व छळ थांबवावा, प्रसाधन गृह, आराम कक्ष व पिण्याचे श्ुद्ध पाणी मिळावे अशा एकूण २४ मागण्या केल्या होत्या. त्यातील एकही मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशस्वी पाटील यांनी १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यावर शासन त्याकडे लक्ष देत नाही.
वेळीच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि झोपी गेलेल्या शासनाच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे संघाच्या उपाध्यक्षा निर्मला भालेराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)