परीक्षा आणि सणांमुळे ठाण्यात राजकीय आंदोलनाला बंदी: पोलिसांचा मनाई आदेश
By जितेंद्र कालेकर | Updated: April 29, 2024 22:11 IST2024-04-29T22:11:25+5:302024-04-29T22:11:51+5:30
ठाणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह इतर विविध परीक्षा आणि महाराष्ट्र दिनासह सण उत्सवांसाठी ठाणे शहर ...

परीक्षा आणि सणांमुळे ठाण्यात राजकीय आंदोलनाला बंदी: पोलिसांचा मनाई आदेश
ठाणे: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह इतर विविध परीक्षा आणि महाराष्ट्र दिनासह सण उत्सवांसाठी ठाणे शहर पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही राजकीय आंदोलन, मोर्चे आणि निदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, शस्त्र, स्फोटक पदार्थ बाळगण्यास आणि घोषणाबाजी करण्यालाही मनाई आदेश काढल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सोमवारी दिली.
आपल्या मनाई आदेशामध्ये उपायुक्त गोरे यांनी म्हटले आहे की, १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन आहे. तसेच ६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यदिन तर ९ मे रोजी तारखेप्रमाणे महाराणा प्रताप जयंती आणि परंपरेने येणारी शिवजयंती आहे. त्याचबरोबर १० मे रोजी अक्षय्य तृतीया, बसवेश्वर जयंती असून २ मे ते ३१ मे या कालावधीमध्ये तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षांसह इतरही परीक्षा आहेत. या सर्वच पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हा मनाई आदेश काढला आहे. त्यामुळे या काळात कोणतेही शस्त्र, तलवारी, दगड किंवा अगदी क्षेपणास्त्रे बाळगणे, जमा करणे आणि तयार करण्याला बंदी आहे. सार्वजनिक रितीने घोषणाबाजी, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे त्याचबरोबर चिथावणीखोर भाषणे, मिरवणूकांना बंदी असून पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणूका काढणे यालाही बंदी घातली आहे.
तर राजकीय सभांना राहणार परवानगी-
निवडणूक आयोगाच्या परवानगीनेच लाेकसभा निवडणूकीच्या राजकीय प्रचार सभा आणि मिरवणूकांसाठी अनुमती दिली जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना या मनाई आदेशातूनसवलत दिली जाणार आहे. सरकारी नोकर आणि सरकारी कर्तव्यावरील अधिकाºयांनाही हा मनाई आदेश लागू राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.