राजकीय प्रचारात ‘तोंडचे पाणी’ पळवणार, इच्छाशक्तीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:54 AM2017-11-10T00:54:02+5:302017-11-10T00:54:09+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न हाच निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर आश्वासने देत मते मागण्याची तयारी सुरू केली आहे.
अंबरनाथ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न हाच निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर आश्वासने देत मते मागण्याची तयारी सुरू केली आहे. दीर्घकाळ हा प्रश्न भेडसावत असूनही तो सोडवण्यासाठी आजवर राजकीय इच्छाशक्ती दाखवण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या अंबरनाथमधील चारही गटात पाण्याचा प्रश्न तीव्र असून तो सोडविण्यासाठी कोणाचे आश्वासन मतदार स्वीकारणार याची उत्सुकता आहे.
अंबरनाथ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. त्यात वांगणी, चरगांव, नेवाळी आणि वाडी हे चार गट आहेत. अंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग हा अंबरनाथ शहर आणि बदलापूर शहराच्या सीमेवर वसला आहे. ज्या गावातून नदी जाते त्याच गावावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गावांवरही पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. वांगणी हे गाव झपाट्याने वाढत असले तरी त्याची पाणीयोजना अद्याप पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण करुन घेण्याची राजकीय इच्छाशक्तीच दिसलेली नाही. या भागातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम रोखण्याचे काम काही ग्रामस्थ आणि राजकारणी करीत आहेत. आपल्या शेतातून जलवाहिनी नको म्हणून राजकीय पुढारी शेजारील शेतकºयांच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचा हट्ट करीत आहेत. या राजकीय बाळहट्टामुळे वांगणीची मंजूर पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. वांगणीची ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दरवेळी एकच मुद्दयावर लढविण्यात येते ती म्हणजे पाणी समस्या. असे असतांनाही या गावातील पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
वांगणीसोबत चरगांव या गटातही पाण्याचा प्रश्न कायम आहे. अनेक गावांची पाणीयोजना बारवी नदीवर अवलंबून आहे. मात्र या सर्व योजना जुन्या असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीवर जाण्याची वेळ येते. गावाशेजारुन नदी वाहत असली तरी ग्रामस्थांना पाणी मात्र सहज मिळत नाही. हाच सर्वात मोठा अडसर, त्रास आहे. अनेक गावांची नळपाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून ती नव्याने उभारण्यासाठी निधीची कमतरता भासते आहे. एमआयडीसीचे बारवी धरण जवळ असले, तरी या धरणाचा उपयोग अजुनही ग्रामस्थांना होत नाही. पाण्याचे स्त्रोत असतांनाही केवळ योजना रखडल्याने या भागातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
मलंगगड पट्ट्यातील नेवाळी हा भाग जलदगतीने विकसित होत आहे. या पट्ट्यातूनच एमआयडीसीची जलवाहिनी शिळफाटा मार्गे नवी मुंबई आणि ठाणे शहरापर्यंत गेली आहे. नेवाळी पट्टयात शासनाचा कुशिवली धरणाचा प्रस्ताव आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या धरणाचे कामच रखडलेले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी नैसर्गिक परिस्थिती पूरक असतानाही या भागात त्यावर काहीही काम झालेले नाही. तशी राजकीय इच्छाशक्ती दाखवलेली नाही. एमआयडीसीच्या जलवाहिनीतुनच या ग्रामस्थांना पाण्याचा पुरवठा केला जातो. भाल, वसार, द्वारली, नेवाळी, चिंचवलीसह अनेक ग्रामीण भाग केवळ एमआयडीसीवर अवलंबून आहे. त्यातच पाण्याची जी जोडणी देण्यात आली आहे ती वाढत्या गावासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे जलवाहिनीपासून लांबच्या पल्ल्यावर असलेल्या गावांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. ती सुधारणा करण्यासाठी जो राजकीय प्रभाव पडायला हवा, तसा पडत नसल्याने ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही.
मलंगगडाच्या पायथ्याशी असलेले मलंगगड आणि वाडी ही गावे बारमाही पाण्यासाठी संघर्ष करित आहेत. या गावापर्यंत पाणी पोहचविण्याचे प्रभावी यंत्रणाच उभारण्यात आलेली नाही.