फोडाफोडीच्या समीकरणाने ठाण्यात राजकीय भूकंप, ठिकठिकाणी निषेध, भाजपमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 12:51 AM2019-11-24T00:51:26+5:302019-11-24T00:51:59+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना फोडून भाजपने केलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर ठाण्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना फोडून भाजपने केलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर ठाण्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपला सत्ताच स्थापन करायची होती, तर ती नैतिकता बाळगून करणे अपेक्षित होते, असे मत ठाण्यातील राजकीय मंडळीनी व्यक्त केले. शिवसेनेचा किंवा राष्टÑवादीचा एकही आमदार किंवा इतर पदाधिकारी फुटणार नसल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला असून, दुसरीकडे भाजपच्या गोटातून सत्तास्थापनेचे स्वागत केले जात आहे.
राज्यात एका रात्रीत सत्तेची समीकरणे बदलल्याने काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेचे अवसान गळल्यासारखे झाले आहे. ठाण्यातही या घटनाक्रमाचे तीव्र पडसाद उमटले. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देत, तीव्र निषेध नोंदवला. शिवसेनेचे आमदार मात्र आम्ही पक्षासोबतच असल्याचा दावा करत होते. परंतु सत्तेसाठी भाजपने केलेले राजकारण अतिशय वाईट असून, एक पक्ष फोडणे आणि त्यातही एखाद्याचे घर फोडणे, वाईट असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतून व्यक्त होत आहे. भाजपला सत्ताच स्थापन करायची होती, तर रात्रीचा खेळ का खेळला गेला, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आपली लढाई ही पुरोगामी विचारांसाठी सुरु असल्याचे सांगत, आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने मात्र अद्याप वेळ असल्याचे सांगून, लवकरच पुन्हा समीकरणे ही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली असतील, असा दावा केला आहे.
दरम्यान, सत्ता स्थापनेमुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून आले. मागील काही दिवसांपासून चिंतेत असलेले भाजपच्या मंडळीमध्ये उत्साह संचारला होता.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी, सत्तास्थापनेची प्रक्रि या अजूनही पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्राला वेगळी राजकीय व सामाजिक परंपरा आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपने केलेल्या उठाठेवी अत्यंत चुकीच्या आहेत. यामध्ये राज्यपालांनीही चुकीची भूमिका घेतली.
- रईस शेख, आमदार, समाजवादी पक्ष, भिवंडी पूर्व
एखादा पक्ष फोडणे, त्याहीपेक्षा एखाद्याचे घर फोडणे अतिशय चुकीचे आहे. तुम्हाला सत्ताच स्थापन करायची होती, तर ती नियमानुसार, कायद्यानुसार स्थापन करणे अपेक्षित होते. त्यासाठी असा रात्रीचा खेळ करायची काय गरज होती?
- नरेश म्हस्के,
महापौर, ठाणे
महिनाभरापासून सत्तास्थापनेची प्रकिया सुरु आहे. अखेर भाजपचाच मुख्यमंत्री झाला असून त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. सत्तास्थापनेमुळे मतदारराजाही निश्चितच आनंदी झाला आहे.
- संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे शहर
जातीयवाद्यांना रोखण्याची भूमिका शरद पवार यांची होती, ती आजही कायम आहे. त्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सुरुवातीपासून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि कायम त्यांच्यासोबतच राहणार आहोत.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्टÑवादी, मुंब्रा - कळवा मतदारसंघ
देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी घेतलेली शपथ ही राज्यघटना डावलून घेतलेला निर्णय आहे . एका रात्रीत घाईघाईने सत्ता स्थापनेसाठी केलेली धडपड म्हणजे, संविधानातील कायद्यांचे उल्लंघन आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे केवळ पाच आमदार अजित पवारांसोबत गेले असून, इतर आमदार पक्षासोबतच आहेत. राष्ट्रवादीतून गेलेल्या पाच आमदारांवर पक्षश्रेष्ठी निलंबनाची कारवाई करतील आणि सत्तास्थापनेची गणितं बदलतील.
- शांताराम मोरे, आमदार, शिवसेना, भिवंडी ग्रामीण
आजच्या राजकीय घडामोडींकडे पाहिले, तर राज्यपाल आणि राष्ट्रपतीसारख्या जबाबदार व्यक्तींकडून राज्यघटनेची पायमल्ली झाल्यासारखे वाटते. राष्ट्रपती आणि राज्यपालांची भूमिका मला याप्रसंगी योग्य वाटत नाही. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
- रुपेश म्हात्रे, माजी आमदार, शिवसेना, भिवंडी पूर्व
सद्य:स्थितीत जे चित्र दिसते आहे, त्यामध्ये येत्या काही दिवसांत निश्चित बदल झालेला असेल. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल, हे निश्चित. परंतु जे झाले, ते अतिशय अयोग्य आहे.
- मनोज शिंदे,
शहर अध्यक्ष, काँग्रेस
खबरदारीसाठी सशस्त्र बंदोबस्त
ठाणे : राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाच परिमंडळातील महत्वाचे चौक, जंक्शन, सर्व पक्षांची कार्यालये व महत्वाच्या ठिकाणी शहर पोलिसांनी खरबदारी म्हणून सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय तीन एसआरपीएफच्या तुकड्या बोलण्यात आल्या असून शहर पोलीस मुख्यालयातही १०० जणांची विशेष फोर्स तयारीनिशी ठेवली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत पेट्रोलिंग करून परिस्थितीचा अंदाज घेण्याचे कामही सुरू असून त्यांना अलर्ट राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. एकूणच परिस्थितीमुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
शिवसेना-राष्टÑवादी-काँग्रेस अशी नवीन आघाडी स्थापन करून सत्तास्थापनासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू असताना, शनिवारी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय भूकंपामुळे वेगवेगळे पक्ष आणि गट आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ठिकठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवला. प्रत्येकी १00 जवानांच्या तीन एसआरपीएफ तुकड्यांसह पोलीस मुख्यालयात १०० जवानांची फोर्स सुसज्ज आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फतही खबरदारी घेतली जात आहे. वरिष्ठ अधिकाºयांमार्फत पेट्रोलिंग करून परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
राजकीय घडामोडीचे पडसाद उमटू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यानुसार सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरून तीन एसआरपीएफच्या तुकड्या बोलावल्या आहेत. याशिवाय पोलीस मुख्यालयात शंभर जणांची फोर्स सज्ज आहे.
- बाळासाहेब पाटील, उपायुक्त, पोलीस, विशेष शाखा, ठाणे शहर