राजकीय फटाके फुटणार :बंदीवरून पेटले राजकारण,शिवसेना-मनसेला रिपाइंने दिले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:17 AM2017-10-13T02:17:02+5:302017-10-13T02:17:17+5:30
ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे.
ठाणे : ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. दहीहंडी, दिवाळी अशा हिंदूंच्या सणांच्यावेळी निर्बंध आणले जाणार असतील, तर ते सहन केले जाणार नाही, असा पवित्रा या पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्यावर एक जरी फटाक्याचे दुकान दिसले, तरी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने दिला आहे. या राजकीय पक्षांनी आपापले इशारे खरे केले, तर ठाण्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना आणि मनसेने त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर गुरु वारी ठाणे रिपाइंने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एकाही फटाक्याचे दुकान रस्त्यावर लावू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही निवासी भागात फटाके न उडवण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यात रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी करण्याचे आदेश अग्निशमन दलाने जारी केले. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने फटाकेविक्रेत्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर रिपाइं (आठवले) ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली.