मॅरेथॉनच्या आडून राजकीय खेळ, एकाच टेबलावर स्पर्धा आणि भाजप सदस्यनोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:24 PM2019-08-12T23:24:13+5:302019-08-12T23:24:33+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी जागोजागी नोंदणी बुथ लावण्यात आले आहेत.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी जागोजागी नोंदणी बुथ लावण्यात आले आहेत. मात्र, या बुथच्या आडून भाजपने पक्ष सदस्यनोंदणी सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात काहीच वावगे नसल्याचा आव आणून भाजप या प्रकाराचे समर्थन करत आहे. महापालिका प्रशासनही इव्हेंट मॅनेजमेंट ठेकेदारास हे काम दिले असून याबाबत माहिती घेऊ न सांगतो, असे सांगून हात झटकत आहे. नोंदणी ठिकाणी अल्पवयीन मुलांचाही वापर केला जात आहे. या स्पर्धेच्या साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेतर्फे १८ आॅगस्टला महापौर मॅरेथॉन होणार आहे. त्यासाठी सुमारे ६५ लाखांचा खर्च होणार असून पालिकेच्या अंदाजपत्रकात केवळ २३ लाख रुपयांची तरतूद आहे. वास्तविक, जानेवारीमध्येच तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून महापौर चषक स्पर्धा घेण्यात आली होती. तेव्हाही राजकीय प्रसिद्धी आणि अवास्तव उधळपट्टीसाठी हा खटाटोप असल्याची टीका होऊ न साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता.
पुरेशी आर्थिक तरतूद नसताना पुन्हा मॅरेथॉनच्या नावाखाली तोच प्रकार महापालिका प्रशासनाच्या साथीने सत्ताधारी भाजपने चालवल्याची टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने तर साहित्य खरेदीपासून एकूणच यात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. विविध संस्थांनीही सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची राजकीय चमकोगिरीसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालवल्याचे म्हटले आहे. त्यातच शाळकरी विद्यार्थ्यांकडूनही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पैसेवसुली केली गेल्याचे उघडकीस आले .
पालिकेच्या खर्चातून राजकीय प्रसिद्धीसाठी मॅरेथॉनचा वापर केला जात असल्याची टीका होत असतानाच मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांच्या नोंदणीसाठी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच सार्वजनिक ठिकाणी नोंदणी केंदे्र उभारली आहेत. मुळात नगरसेवक, पदाधिकारी आदींच्या खाजगी कार्यालयात महापालिका मॅरेथॉनच्या स्पर्धकनोंदणीला प्रशासनाने परवानगी दिली आहे का, असा सवाल केला जात आहे. या कार्यालयातून पालिका मॅरेथॉन नोंदणीसह भाजपची सदस्यनोंदणीही राबवली जात आहे.
राजकीय वापराबाबत नागरिकांची नाराजी
सार्वजनिक ठिकाणी तर महापौर मॅरेथॉन आणि भाजप सदस्यत्वाची नोंदणी एकाच टेबलावर केली जात आहे. पालिका मॅरेथॉन नोंदणीच्या आड भाजपची सदस्यनोंदणी केली जात आहे. पालिका मॅरेथॉनची जाहिरात असलेली छत्री, फलक, टी-शर्ट घातलेले कार्यकर्ते असताना त्याच ठिकाणी भाजपच्या सदस्यनोंदणीचा फलक लावण्यात आला आहे. एकाच टेबलावर मॅरेथॉनचे आणि भाजप सदस्यत्व नोंदणीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. पालिका मॅरेथॉनची विचारपूस करणाºया इच्छुकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
स्पर्धक नोंदणीची जबाबदारी सायरस रन या इव्हेंट मॅनेजमेंट ठेकेदारास दिलेली आहे. पालिका महापौर मॅरेथॉन आणि भाजप सदस्यनोंदणी एकाच ठिकाणी केली जात असेल, तर याची माहिती ठेकेदाराकडून घेऊन आयुक्तांच्या निर्देशांनुसार कार्यवाही केली जाईल.
- संजय दोंदे, सहायक आयुक्त, मनपा
मॅरेथॉन महापालिकेची असली, तरी मी भाजपचा नगरसेवक आहे. त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धक नोंदणी अर्जासह भाजपचे सदस्यत्व नोंदणी अर्ज, मतदार नोंदणी अर्ज आदी सर्व एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध केलेले आहेत. त्यात चुकीचे असे काही नाही.
- ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक, भाजप
सत्ताधारी भाजप खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाही, तर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पालिकेमार्फत नागरिकांचा पैसा वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर चषकासाठी एक कोटी १० लाख आणि महापौर मॅरेथॉनसाठी ६५ लाखांची उधळपट्टी केली आहे. यात ठेका, साहित्यखरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. - प्रमोद सामंत, कार्याध्यक्ष, शहर काँग्रेस