मोबाइलचोरांना दाखवणार पोलिसी हिसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:27 AM2018-03-22T03:27:19+5:302018-03-22T03:27:19+5:30
रेल्वे प्रवासात वाढत्या मोबाइलचोरीच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यातून मोबाइलचोरी करण्याच्या पद्धती माहीत झाल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य झाले होते.
- पंकज रोडेकर ।
ठाणे : रेल्वे प्रवासात वाढत्या मोबाइलचोरीच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यातून मोबाइलचोरी करण्याच्या पद्धती माहीत झाल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य झाले होते. परंतु, अलीकडे मोबाइलचोरीचे प्रकार पुन्हा वाढले असून चोरट्यांनीही चोरीच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे त्यांना वेळीच आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी नवा उतारा शोधून लोकलच्या डब्यात साध्या वेशातील पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसागणिक लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी पेट्रोलिंगवर विशेष भर देऊन चोरट्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी टॉप २५ चोरट्यांची यादी अद्ययावत केली आहे. त्यातच स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही उपयोग होऊ लागल्याने चोरट्यांच्या चोरी करण्याच्या काही पद्धती समोर आल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणखी सोपे झाले. मध्यंतरी, चोरट्यांनी चोरीच्या प्रकारात बदल केल्याने पुन्हा मोबाइलचे चोरीचे गुन्हे वाढले. हे प्रकार सर्वाधिक ठाणे रेल्वे स्थानकात वाढल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, दिवा आणि कळवा या रेल्वे स्थानकात चोरीचे प्रकार वाढले. दरदिवसाला मोबाइलचोरीचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ४ ते ५ गुन्हे नोंदवले जात आहेत.
जून २०१७ पासून लोकलमध्ये चोरीला जाणाºया मोबाइलबाबत थेट एफआयआर नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, मागील वर्षात ठाणे रेल्वे प्रवासात तब्बल ३,००२ मोबाइल चोरीस गेले आहेत. चोरीला गेलेल्या मोबाइलची किंमतही ४ लाख ९५ हजार ३८६ इतकी आहे. तसेच त्यापैकी २८९ गुन्हे उघडकीस आले असून हे प्रमाण अवघे १० टक्के असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
‘‘मोबाइलचोरीच्या वाढत्या घटनांमुळे सध्या ठाणे असो या इतर रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटावर दोन पोलीस तैनात केले आहेत. त्यातच आता मोबाइल चोरट्यांनी चोरीच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवासात लोकल डब्यात साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार आहेत. त्यानुसार, रेकॉर्डवरील चोरट्यांवर वॉच ठेवून गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल.’’
- उत्तम सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस