लोकसभा निवडणुकीच्या मतांच्या पेरणीसाठी ठाण्यात राजकीय नेत्यांची मंदियाळी
By अजित मांडके | Published: January 12, 2024 04:07 PM2024-01-12T16:07:28+5:302024-01-12T16:08:02+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाण्यात मागील काही दिवसापासून विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची मंदियाळी सुरु झाली आहे.
अजित मांडके ,ठाणे : आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाण्यात मागील काही दिवसापासून विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची मंदियाळी सुरु झाली आहे. तसेच पुढील आठवडाभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेते हजेरी लावणार असून आगामी लोकसभा निवडणुकीची पेरणी करणार असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी आयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे, कल्याण डोंबिवली आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष संघटना मजबुत करण्याबरोबर जनेतपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय नेत्यांची ठाण्यासह कल्याण, डोंबिवली दिवा या भागात हजेरी लावण्यास सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि ग्रामीण भागात वादळी दौरा केला होता.
तसेच या ठिकाणी एक सभा देखील घेतली होती. तसेच जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर रामभाऊ म्हाळगीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यासह जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
मल्लगंड मुक्तीसाठी त्यांनी पुन्हा एकदा साद घातली आहे. तर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून देखील ठाण्यात त्यांनी हजेरी लावली होती. तर शिवसेना कुणाची हे निश्चित झाल्यानंतर शिंदे यांचे पक्षातील वजन आणखी वाढले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेचीच असा निकाल आल्यानंतर त्यांनी ठाण्यात येऊन स्वर्गीय आनंद दिघे यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ठाण्यात एकदा नव्हे तर दोनदा हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी घोडबंदर भागात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते ठाण्यात येणार आहेत. तसेच रामायण महोत्सवाच्या निमित्ताने देखील २० जानेवारी रोजी ते ठाण्यात हजेरी लावणार आहेत. याशिवाय राष्टÑवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांना देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार व पक्षातील इतर नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत.
याशिवाय भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील घोडबंदर भागात हजेरी लावणार आहेत. घोडबंदर भाग हा भाजपचा मागील काही वर्षात बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे येथील भागाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपची मंडळी या भागात अधिक संख्येने हजेरी लावणार असल्याचे चित्र आहे. तिकडे विरोधी पक्षातील अर्थात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे देखील शनिवारी दिवा भागात दौरा करणार आहेत. दिवा हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जात आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातील एक प्रमुख लीड देणार भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे दिवा भागाकडे सर्वच पक्षांनी आपला मोर्चा वळविला आहे.
लोकसभेची पेरणी :
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार हे अद्याप चित्र स्पष्ट नसेल तरी देखील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी ठाण्यात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शुंभराज देसाई यांच्यासह महायुतीमधील १५ घटक पक्षाचे नेते देखील या निमित्ताने ठाण्यात मतांची पेरणी करणार आहे