राजकीय नेत्यांची पत्रकबाजी
By admin | Published: October 21, 2015 03:11 AM2015-10-21T03:11:42+5:302015-10-21T03:11:42+5:30
कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र सहानुभूती आणि पत्रकबाजी
ठाणे : कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र सहानुभूती आणि पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे.
परमार यांनी आत्मेहत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोट आणि परमार यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या गोल्डन गँगवरील आरोपामुळे ठाणे महापालिकेतील ही गॅग कोण अशी जोरदार चर्चा होण्यास सुरुवात झाली. हे आरोप होत असताना काही राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार ठाणे महापालिकेतील अज्ञात अधिकारी व नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. तसेच हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे वर्ग केला. याप्रकरणी विशेष पथकाची निर्मिती करून पोलिसांनी महापालिकेत जाऊन झाडाझडती घेतली. तर मंगळवारी झालेल्या ठामपा सर्वसाधारण सभेत चक्क साध्या वेषात पोलिसांनी हजेरी लावून कानोसा घेतला.
काही राजकीय नेते मंडळीनी बिल्डरांची सहानुभुती मिळवत असताना दुसरीकडे काहींनी जोरदार पत्रकबाजी करण्यास सुरूवात केली. यामागे नेमके त्यांचे काय हित आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. तर परमार यांना झालेल्या त्रास ठाण्यातील अन्य बांधकाम व्यावसायिकांना झाला नसल्याने त्याबाबत अद्यापही तक्रार वा निवेदन सुद्धा पोलिसांकडे आले नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच जर तशी तक्रार आल्यास सखोल चौकशी करून त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)