खाडीपुलाच्या कामात राजकीय दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:38 AM2018-09-01T03:38:31+5:302018-09-01T03:38:51+5:30
मोठागाव ठाकुर्ली - माणकोली पूल : महापौरांनी मांडला मुद्दा
कल्याण : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे काम डोंबिवलीच्या बाजूने नाही, तर भिवंडीच्या बाजूने रखडले आहे. या कामात राजकीय दबाव आणून त्याचे अलायमेंट बदलण्याचा घाट घातला जात आहे, अशी बाब कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांनी बैठकीत एमएमआरडीए आयुक्तांसमोर मांडली. राजकीय दबावप्रकरणी त्यांचा रोख भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे असला, तरी त्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले आहे.
मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१६ मध्ये झाला. मात्र, या कामाला गतीच नाही. डोंबिवलीच्या दिशेने पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या जागेचे महापालिकेने संपादन केले आहे. डोंबिवलीच्या दिशेने काम सुरू आहे, परंतु भिवंडीच्या दिशेने कामात गती नाही. तेथील खारफुटी झाडे तोडण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राजकीय दबाव आणून अलायमेंट बदलण्याचा घाट घातला जात आहे. खाडीपलीकडे बड्या बिल्डरांनी जागा घेतल्या आहे. त्यामुळेच हे अलायमेंट बदलले जात असावे. त्यामुळे भिवंडीच्या दिशेने जागेचे संपादनही झालेले नाही. त्यामुळे हा पूल मार्गी लागण्याची चिन्हे नाहीत, याकडे महापौरांनी लक्ष वेधले. कल्याण-डोंबिवलीची वाहतूककोंडी सुटण्यास या पुलामुळे मदत होणार आहे. पुलाचे काम पूर्ण होणार नसेल, तर कोंडी कशी सुटणार, असा सवाल महापौरांनी केला. या बैठकीस एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव, केडीएमसीचे सभागृह नेते श्रेयस समेळ, गटनेते दशरथ घाडीगावकर, सहा. संचालक म.दा. राठोड, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार ही बैठक झाली.
कंत्राटदारावरील कारवाई गुलदस्त्यात
च्दुर्गाडी खाडीपुलावरील सहापदरी उड्डाणपुलाचे काम कंत्राटदार अर्धवट टाकून पळून गेला आहे. या पुलाच्या डिझाइनमध्ये बदल केल्याने कामास विलंब झाला आहे.
च्पुलाच्या कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी सांगितले. काम अर्धवट सोडून गेलेल्या कंत्राटदारावर काय कारवाई केली, याविषयीची माहिती एमएमआरडीएने दिलेली नाही.
च्रिंग रोडसाठी ४० टक्के जागेचे संपादन झालेले आहे. उर्वरित ४० टक्के जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे महापौरांनी सांगितले.