ठाण्यात राजकीय राडा, कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 05:55 AM2023-04-05T05:55:56+5:302023-04-05T05:56:15+5:30
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण, सोशल मीडियावरील पोस्टमुळे हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (रा. टिटवाळा) यांच्यावर १५ ते २० महिलांच्या गटाने सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हल्ला केला. कासारवडवली येथील टाटा मोटर्सच्या कार्यालयातून त्या बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर हा हल्ला झाला. शिंदे यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, मंगळवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे हे सपत्नीक रोशनी यांच्या भेटीकरिता खासगी इस्पितळात दाखल झाले. त्यांनी रोशनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या भेटीकरिता गेले. मात्र आयुक्त हजर नव्हते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.रोशनी या ठाण्यातील कासारवडवली येथील टाटा मोटर्सच्या कार्यालयात नोकरीला आहेत. ठाण्यातील सावरकर यात्रेत एका पत्रकाराला धमकाविण्याच्या घडलेल्या घटनेबाबत रोशनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सोमवारी रोजी रात्री ८.२५ वाजेच्या सुमारास त्या आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियंका मसुरकर, प्रतीक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार आणि सिद्धार्थ ओवळेकर तसेच इतर १५ महिलांनी एकत्र कार्यालयात शिरून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी तक्रार रोशनी यांनी कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांना दिलेल्या अर्जात केली आहे.
तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यास आपण त्याठिकाणी प्रत्युत्तरादाखल आपले मत मांडले. परंतु, गवस यांनी आपल्यावर वैयक्तिक शेरेबाजी केली. त्याला आपण प्रत्युत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावरील प्रतिक्रियेमध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही आपल्याला वारंवार धमकीचे फोन येऊ लागले. चूक नसतानाही भांडण वाढवायचे नसल्याने माफी मागितली. तरीही आपल्या कार्यालयात शिरून आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. सोबत हल्ला झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजही अर्जासोबत त्यांनी दिले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, खासदार राजन विचारे हे मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कासारवडवली पोलिस ठाण्यात बसून होते. सोमवारी रात्री १० वाजता शिंदे यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर मंगळवारी २० तास उलटूनही दिवसभर गुन्हा दाखल झालेला नव्हता, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
माझ्या पोटावर लाथा मारू नका, म्हणून मी विनवणी केली. तरीही माझ्या पोटावर मारण्यात आले. पोलिस ठाण्यात मी दोनवेळा चक्कर येऊन पडले. तरीसुद्धा कुणी लक्ष द्यायला तयार नव्हते. खासदारांनी जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालयात नेले. तिथे उलट्या होत होत्या, पण कुणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. दुखतेय असे सांगूनही कुणी लक्ष देत नसल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल झाले. -रोशनी शिंदे, महिला पदाधिकारी, शिवसेना ठाकरे गट
रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याबाबत त्यांनी तक्रार अर्ज कासारवडवली पोलिस ठाण्यात दिला आहे. या अर्जाची चौकशी करण्यात येत आहे. -अमरसिंग जाधव, पोलिस उपायुक्त, वागळे इस्टेट, ठाणे शहर