पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णयामुळे राजकीय गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:45 AM2021-09-22T04:45:14+5:302021-09-22T04:45:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : गेल्या दीड वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय पुढाऱ्यांना राज्य शासनाने नवीन धक्का दिला आहे. नगरपालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेण्याबाबत राज्य शासनाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्याने पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. पण कोरोना काळामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात दीड वर्ष उलटले तरीही पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रभागातील आरक्षण अशा सर्व गोष्टी पूर्ण झाल्या असून मतदार याद्यादेखील निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. पालिकेची निवडणूक एक सदस्य पद्धतीने म्हणजे एक वाॅर्ड, एक नगरसेवक अशा पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र राज्य शासनाने पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका दि्वसदस्यीय पद्धतीने म्हणजे दोन वाॅर्डांचा मिळून एक प्रभाग करून त्यानुसार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना, केवळ कोरोनामुळे निवडणुका न झाल्याने राज्य शासनाचा नवीन आदेश अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेला लागू होईल का नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.
इच्छुकांचे धाबे दणाणले
दि्वसदस्यीय पद्धतीमुळे अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रभागात निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. एवढेच नव्हे, तर आरक्षण आणि प्रभागात बदल झाल्यास त्याचा फटकाही इच्छुक उमेदवारांना सहन करावा लागणार आहे.
-------------