कोपर दिशेकडील पुलावरून डोंबिवलीत रंगले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:40 PM2019-05-27T23:40:49+5:302019-05-27T23:40:53+5:30

डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

Politics of Dombivli in the direction of the bridge towards the Kopar | कोपर दिशेकडील पुलावरून डोंबिवलीत रंगले राजकारण

कोपर दिशेकडील पुलावरून डोंबिवलीत रंगले राजकारण

Next

कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासाठी मनसेने मैदानात उडी घेताना पूल बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून रेल्वे आणि महापालिकेत यासंदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पूल बंद करण्यापूर्वी केडीएमसीने वाहतुकीसंदर्भात काय नियोजन केले आहे, याबाबत केडीएमसीने दोन दिवसांत लेखी स्वरूपात मनसेला उत्तर द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
मनसेचे गटनेते हळबे यांच्यासह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, माजी नगरसेवक हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक, युवा पदाधिकारी सागर जेधे यांनी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद करण्याविषयी २० मे रोजी रेल्वे प्रशासनाने महापालिकेस पत्र दिले. २७ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता; मात्र तो अद्याप सुरूच आहे. रेल्वे व महापालिकेत पुलाविषयी समन्वय नसल्याने गोंधळाचे वातावरण असल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला आहे.
कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल १९८० मध्ये खुला झाला. तेव्हा डोंबिवली पूर्व-पश्चिमेची लोकसंख्या कमी होती. लोकसंख्या वाढल्याने या पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलून ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती केली. हा पूल तयार झाल्यावर वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, हा पूल अर्धवट आणि अरुंद आहे. त्याचे पोहोचरस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण बंद न करता त्यावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवून त्याची देखभाल-दुरुस्ती करता येईल का, असा पर्याय नागरिकांना द्यावा. पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवण्याचा पर्याय दिला, तर अरुंद पोहोचरस्ते हे एकेरी वाहतुकीचे करावेत, अशी मागणी मनसेने खोडके यांच्याकडे केली. कोपर पुलाचाकोणता भाग धोकादायक आहे. त्यासाठी निविदा काढली आहे का, पुलाचे काम किती दिवसांत पूर्ण होईल. त्याची निश्चित डेडलाइन किती असेल, याचा खुलासा पालिकेने करावा. पत्रीपूल पाडला. त्याचे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे कोपर पुलाचा पत्रीपूल होऊ देणार नाही, असे मनसेने स्पष्ट केले आहे.
>केडीएमसीत आज बैठक
कोपर दिशेकडील पुलासंदर्भात रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यासोबत मंगळवारी बैठक होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी दिली. या बैठकीत मनसेच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याची अनुमती द्यावी. मनसेच्या स्थानिक प्रतिनिधींना पुलाविषयी चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले जाऊ शकतात, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Politics of Dombivli in the direction of the bridge towards the Kopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.