"राजकारण बेसूर झाले, मी खूप गमावलंय, पण जनतेचं प्रेम मात्र कमावलंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:54 AM2023-11-20T11:54:42+5:302023-11-20T11:55:08+5:30
लतादीदींच्या नावे संगीत गुरुकुल ठाण्यात होणे अभिमानास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राजकारण बेसूर झाले आहे. मात्र, देशाची शान गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे. ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्वश्रेष्ठ लतायुग आपण अनुभवले. त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी गुरुकुलसारख्या संस्था उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. नागरिकांच्या पाणीप्रश्नाबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे पालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या याेजनेंतर्गत वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाच्या (गुरुकुल) कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रिमोटच्या माध्यमातून पार पडले. यावेळी लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक, कृष्णा मंगेशकर, पालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक आदींसह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयासाठी सरकारकडून २५ कोटी
n शिंदे म्हणाले, विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने २५ कोटी दिले आहेत. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. शास्त्रीय संगीतातील पंडित राम मराठे, ज्यांची गाणी लतादीदींनी गायली ते पी. सावळाराम ठाण्यातील. ही परंपरा पुढे नेण्यासाठी गुरुकुलची स्थापना हा एक भाग आहे. यातून गायक आणि संगीतकार घडतील. या उपक्रमाला सरकारच्या वतीने पाठबळ देऊ.
n ठाण्यात पूर्वी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. परंतु, त्या प्रदूषित झाल्या आहेत. ज्या विहिरींनी आपली तहान भागवली, त्या विहिरींना विसरू शकत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही आपली संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ५० कोटींच्या निधीतून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले जाणार आहे. ठाणेकरांमुळे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याचे रस्ते देखील धुण्याचे आदेश महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
क्लस्टरमुळे मिळणार हक्काची घरे
आ. प्रताप सरनाईक यांनी संगीत विद्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीयांनी घेण्याची विनंती केली. ती स्वीकारून उषा मंगेशकर यांनी आभार व्यक्त केले. बदलते ठाणे पाहून, उषा मंगेशकर यांनी मुंबईतही चांगले रस्ते व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगले रस्ते करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.
बोल तेरे साथ क्या सुलूक...
लता मंगेशकर यांच्या ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय...’ या गाण्याची आठवण करीत आपण मात्र सर्व सोडून काम करीत असतो. खूप गमावलंय, पण जनतेचे प्रेम मात्र कमावलंय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राजकारण बेसूर झाले असून काही कावळ्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही वाढल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.