125 दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले, भाईंदरमध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:15 AM2021-04-03T02:15:18+5:302021-04-03T02:15:37+5:30

मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Politics heats up with 125 million liters of water, allegations in Bhayander | 125 दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले, भाईंदरमध्ये आरोप-प्रत्यारोप

125 दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले, भाईंदरमध्ये आरोप-प्रत्यारोप

Next

मीरा रोड : मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीपुरते १२५ दशलक्ष पाणी देऊन भाजपने जनतेची फसवणूक केली, आता स्वतःची पापे झाकण्यासाठी भाजप कांगावा करीत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना व काँग्रेसने दिले आहे. 
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी अलीकडेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाकडून १२५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ३० दशलक्ष लीटर पाणी कमी मिळत आहे, असे जाहीर केले. 
शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन भाईंदर पूर्व भागात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागात कमी पाणी सोडले जात असल्याने टंचाई जाणवत असल्याचे सांगितले.  सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे पाणीवाटपात भेदभाव केला जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात जास्त पाणी सोडले जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण यांनी बुधवारी केला. 
गुरुवारी भाजपचे उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन शहरातील पाणी समस्येला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरात दोन आमदार व खासदार असून शासनकडून कमी पाणी दिले जात आहे. पालिकेत भाजपची सत्ता असल्याने हेतूत: कमी पाणी दिले जात आहे. याच्या निषेधार्थ १२ एप्रिलपासून आयुक्त दालनाबाहेर धरणे धरू, असा इशारा भाजपने दिला. 
भाजपच्या आरोपांवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले की, एमआयडीसीचे १२५ दशलक्ष लीटर पाणी काँग्रेस आघाडी शासन काळातच मंजूर झाले होते; परंतु आम्ही पाणी आणले व २४ तास पाणी देण्याचा खोटा प्रचार निवडणुकीत भाजपाने केला. निवडणुकीत भाजपचे नरेंद्र मेहतांना जनतेने पाणी पाजले आणि शहरात पाणीटंचाई सुरू झाली. महापौरांना एमआयडीसीने दिलेल्या पत्रातच ते १२५ दशलक्ष लीटर पाणी केवळ पावसाळ्यापुरते तात्पुरते होते असे स्पष्ट केले होते. यावरून भाजपने  मतांसाठी लोकांची फसवणूक केली, असा आरोप सामंत यांनी केला. 
विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील म्हणाले की, एमआयडीसीकडून मिळणारे पाणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंजुरीमुळे शहराला मिळत आहे. वास्तविक उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होतो व त्याच्या नियोजनासाठी पाणीकपात यापूर्वीसुद्धा केली गेली आहे; परंतु शहरातील पाणी गळती रोखणे, समान पाणीवाटप करणे,  अनधिकृत नळजोडण्या रोखणे, वितरण यंत्रणा सुधारणे यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपने स्वतःची पापे झाकण्यासाठी हा कांगावा सुरू केल्याचा आरोप पाटील यांनी केला. 
सामाजिक संस्थेचे पदाधिकारी भगवान कौशिक म्हणाले की, महापालिकेने बिल्डरांच्या नवीन बांधकाम प्रकल्पांसह अनधिकृत बांधकामे आणि स्वतःच्या क्लब, इमारती आदी बांधकामांना नव्याने नळजोडण्या दिल्या.  

भिवंडीला मुंबई पालिकेकडून अतिरिक्त 
दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा
 भिवंडी : शहरातील वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराला अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. खासदार कपिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
 पाटील यांच्या मागणीची दखल घेत शहराला वाढीव पाणीपुरवठा मंजूर करीत असल्याचे पत्र मुंबई मनपा आयुक्तांनी खा. पाटील यांना पाठविले आहे. या वाढीव पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांची पाणीसमस्या कमी होणार आहे. यंत्रमाग व गोदामपट्टा यामुळे शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथे नेहमी पाणीटंचाई भासते. मुंबई महापालिकेबरोबरच भिवंडी शहराला स्टेमकडूनही पाणीपुरवठा केला जातो. 

वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठ्यासाठी खा. पाटील यांनी चहल यांना पत्र पाठविले व त्यांच्याबरोबर चर्चाही केली होती. भिवंडी पालिकेने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर जलजोडणी देण्यात येणार असल्याचे चहल यांनी नमूद केले.

Web Title: Politics heats up with 125 million liters of water, allegations in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.