गाेळीबाराच्या घटनेवरून राजकारण पेटले; सुप्रिया सुळे अमित शाह यांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 09:03 AM2024-02-04T09:03:18+5:302024-02-04T09:03:42+5:30
आमच्यासारखे लोक या कारणामुळे तुरुंंगात जाऊन आले.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांकडून गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश
कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे, हे विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलिस स्टेशनमध्ये का घडली? गोळीबार झाला याचे सत्य शोधावे लागेल. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री.
गायकवाड यांच्या बोलण्यात
वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या
उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली असून, आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. मात्र, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. गायकवाड यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. घटनेबद्दल मी माहिती घेणार असून, याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री.
मुख्यमंत्री शिंदे यांचा राजीनामा घ्या
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलिस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार होतो, हे लांच्छनास्पद आहे, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. सत्ताधारी भाजपचा आमदार सत्ताधारी शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करतो, याचा अर्थ महाराष्ट्रात महायुतीमध्ये गँगवार सुरू आहे. आ. गायकवाड यांनी त्यांचे काेट्यवधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडले आहेत, असे विधान केले. किती कोटी रुपये पडले त्याचा आकडा त्यांनी सांगितला नाही. तो आकडा १००, १५० किंवा २०० काेटी आहे का? हे कोट्यवधी रुपये शिंदे यांच्याकडे असतील, तर त्याला मनी लाँड्रिंग म्हणतात. आमच्यासारखे लोक या कारणामुळे तुरुंंगात जाऊन आले.
- खा. संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट
गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार
राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. सुसंस्कृत राज्यात गँगवॉर चालले असेल आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, मी हा प्रश्न सोमवारी संसदेत उपस्थित करेन. गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.