ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांसाठी १० मे रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 08:23 PM2018-04-16T20:23:06+5:302018-04-16T20:23:06+5:30
४० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी.) ४० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. ३२ सदस्य हे जिल्ह्यातील महानगरपालीकांमधून तर उर्वरित दोन सदस्य नगरपालिकांचे आणि सहा सदस्य हे जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना २० एप्रिलपर्यंत अपर जिल्हाधिकारी, ठाणे किंवा सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. छाननीनंतर २३ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. या प्रसिध्द झालेल्या यादीवर २७ एप्रिलपर्यंत अपील दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. यानंतर ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. आवश्यकता भासल्यास १० मे रोजी निवडणूक घेण्यात येऊन आणि ११ मे रोजी नियोजन भवन येथे मतमोजणी होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.