कल्याण जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी शांततेत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 06:28 PM2017-12-13T18:28:38+5:302017-12-13T18:28:54+5:30
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
कल्याण- कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. कल्याण तालुक्यात दुपारपर्यंत 55 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी पाहता सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.
वरप गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका मतदान केंद्रावर 1 हजार 27 मतदारांचे मतदान होते. दुपारी 1 वाजता या मतदान केंद्रावर 40 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. कांबा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मतदान केंद्रावर दुपारी दीड वाजेर्पयत 61 ते 70 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी संपूर्ण तालुक्यात दुपारी एक वाजता 48 टक्के असताना कांबा गावातील मतदानाची टक्केवारी पाहता कांबा गावातील मतदारांनी मतदानात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले.
कल्याण तालुक्यातील चार गण सोडता अन्य ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीची युती असली तरी कांबा गटातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार संदीप पावशे यांनी सांगितले की, केवळ कांबा गटातच शिवसेना-भाजपाची युती आहे. जास्तीचे मतदान हे आम्हाला फायदेशीर ठरू शकते, असा दावा पावशे यांनी केला. म्हारळ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रात मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. म्हारळ गावातील मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भेट दिली.
प्रत्यक्ष पाहणी पश्चात खासदार शिंदे यांनी सांगितले की, मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळतील. जिल्हा परिषदेवर शिवसेनाचा भगवा झेंडा फडकेल, असा दावा खासदार शिंदे यांनी यावेळी केला.
नेवाळी आंदोलनामुळे खोणीत तणावपूर्ण शांततेत मतदान
नेवाळी विमानतळासाठी ब्रिटिश काळात शेतक-यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्या परत मिळाव्यात यासाठी नेवाळी परिसरातील शेतक-यांनी जून 2017 मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनापश्चात खोणी व पिंपरी परिसरात निवडणूक होत असल्याने खोणी परिसरात तणावपूर्ण शांतते मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. 2002 साली नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली 14 गावे ही कल्याण तालुक्यातील तहसील व कल्याण पंचायत समितीला जोडल्याने या गावांनी खोणी गट व पिंपरी गणासाठी मतदान केले.
मांजर्लीत बदलापूर मांजर्ली गावातील मांजर्ली गटाच्या मतदार यादीत बदलापूर मांजर्ली गावातील 80 मतदारांची नावे मिळून आली. मतदान प्रतिनिधींनी या नावांना आक्षेप घेतला. मात्र हा आक्षेप मतदान अधिका-यांनी धुडकावून लावला.