उल्हासनगरात काही ठिकाणी मतदानाला गालबोट

By admin | Published: February 22, 2017 06:33 AM2017-02-22T06:33:23+5:302017-02-22T06:33:23+5:30

उल्हासनगर शहरात मतदानाला काही भागात गालबोट लागले. ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीसोबत

Polling in some places in Ulhasanagar | उल्हासनगरात काही ठिकाणी मतदानाला गालबोट

उल्हासनगरात काही ठिकाणी मतदानाला गालबोट

Next

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात मतदानाला काही भागात गालबोट लागले. ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीसोबत माजी महापौरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीमुळे वातावरण काही काळासाठी तंग झाले होते. मतदान शेवटच्या टप्प्यात असतांना भाजपा आणि साई पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये वादावादी आणि नंतर हाणामारी झाली.
निवडणूक आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन हजार ५०० पोलिसांची बंदोबस्त देण्यात आला होता. तरीही शहरात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना समोर आल्या. पॅनल क्र मांक १७ मध्ये एक ज्येष्ठ नागरिक १०० मीटर अंतरावर आपल्या घराजवळ असतांना पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत पोलिसांनी त्याला लाठयांनी मारहाण केल्याची घटना समोर आली.
स्थानिक नगरसेविकेने हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्यांनाही न जुमानता या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ केल्याने त्याना आवरण्यासाठी हा प्रकार घडल्याचे पोलीस सांगत असले, तरी शिवीगाळ होण्याआधी पोलिसांनी त्याला दिलेली वागणूक आणि त्याच्यावर बळाचा वापर करुन अटक करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांनी मध्यस्तीचा प्रयत्न केला तरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
प्रभाग १५ मध्ये शिवसेनेचा उमेदवार बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पॅनल क्र मांक ८ मधील मतदान केंद्राच्या परिसरात भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना, बसपाच्याकार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचा प्रकार समोर आला. याबाबत मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मध्यवर्ती पोलिसांनी शहरात बाहेरून आलेल्या काही तरुणांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
साई पक्षाच्या उमेदवार आशा ईदनानी यांच्या वाहनावर सकाळी दगडफेक झाली. प्रभाग ९ मधील प्लॅटिनम हॉस्पिटलजवळील मतदान केंद्रात केंद्रप्रमुख भाजपला मतदान करण्याचा सल्ला देत असल्याचा आरोप ईदनानी यांनी केला. खटलमल चौक परिसरात साई पक्षाच्या कार्यालयात भाजपाच्या ३० ते ३५ व्यक्तींनी महिलांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांना मारहाण झाल्याने काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते.

Web Title: Polling in some places in Ulhasanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.