जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदानयंत्रे रात्रीच पोहचली स्ट्राँग रूममध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:51 AM2019-05-01T01:51:20+5:302019-05-01T01:51:37+5:30
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था : वाहतुकीसाठी मोठ्या कंटेनरचा उपयोग
ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून या मतदारसंघातील ईव्हीएम मशीन घोडबंदर कावेसर येथील न्यू होरॉईजन स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील ६ स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत सुरू होती.
मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएममशीन या त्या-त्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली. सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुथनहाय ईव्हीएम मशीन कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. पहाटे उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालली होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर होते. त्यानंतर कंटेनर सीआरपीएफच्या सुरक्षेच्या घेऱ्यात कावेसर येथील न्यू होरॉईजन स्कूलच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचवण्यात आले.
मंगळवारी पहाटे सकाळी ४.३० वाजता पहिले कंटेनर पोहोचले. त्यानंतर एकेक करून सर्व कंटेनर स्ट्राँगरूमजवळ पोहोचले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास १८ कंटेनरचा उपयोग करण्यात आला. यासर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षा घेºयात ते कावेसर येथे पोहोचवण्यात आले.