ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

By admin | Published: February 22, 2017 05:02 AM2017-02-22T05:02:54+5:302017-02-22T05:02:54+5:30

ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर

Polling in Thane increased by 5 percent | ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

ठाण्यात मतदान ५ टक्के वाढले

Next

ठाणे, उल्हासनगर : ठाणे व उल्हासनगर महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरात ४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाण्यातील मतदानात पाच टक्के वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र उल्हासनगरात पुन्हा मतदारांच्या निरुत्साहाचेच दर्शन घडले आहे.ठाणे शहरात मतदान शांततेत झाले असले तरी मतदार यादीमधील घोळाचे परिणाम विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर दिसून आले. राबोडी, लोकपुरम, कळवा, घोडबंदर, वागळे, किसननगर व इतर भागात हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. ठाण्यातील राबोडी भागातील सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावर गेलेल्या सुमारे दीड हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. महिलांनी तर आक्रमक स्वरूप धारण केले होते.
अखेर या ठिकाणी पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे लोकपुरम भागातही काही मतदारांची नावे यादीतून गहाळ झाली होती. वर्तकनगर भागात मुंब्रा आणि भिवंडीतील मतदार आणून मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप केले गेले. परंतु सतर्कतेमुळे हे बोगस मतदार पकडण्यात आले.
पालिकेच्या निवडणूक विभागामार्फत २० फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने, त्यानंतर मतदाराचा क्रमांक बदलला गेला, तसेच मतदानाचे ठिकाणही बदलले गेले. त्यामुळे मतदारांना आधीच मिळालेल्या स्लीप हाती घेऊन मतदार केंद्रापर्यंत पोहोचल्यावर तुमचे मतदान येथे नाही दुसरीकडे बघा असे सांगितले जात असल्याने असंख्य मतदारांचा गोंधळ उडाला. काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते हाती पेन घेऊन कोऱ्या स्लीप भरून देण्याचे काम करीत होते.  
माजी नगरसेवकाला मारहाण
पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शहाजी जाविर यांना वागळे इस्टेट भागात मारहाण झाली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. किसननगर भागात तर अनिल कुमार यादव नामक मतदाता मतदान करण्यासाठी गेला असता त्याच्या जागी आधीच कोणी तरी मतदान करून मोकळा झाला होता. त्यामुळे या भागातही वातावरण तापल्याचे दिसून आले. मतदानाच्या दिवशीच पैसे वाटणाऱ्या दोघांना चोप देऊन लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन
केले. (प्रतिनिधी)

असा वाढला टक्का
1 सकाळच्या सत्रापासून विविध भागांत मतदारांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्याने सकाळी साडेअकरापर्यंत १०.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक दिसून आला. त्यानंतर पुढील दोन तासांत १९.११ टक्के मतदानाची नोंद झाली. तर पुढील दोन तासांत म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानात केवळ ९ टक्क्यांचीच वाढ दिसून आली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५.०५ टक्के मतदानाची नोंद झाली.
2 उल्हासनगरात काही भागात मतदारांच्या तुरळक रांगा लागल्या होत्या. मात्र यादीत नावे नसल्याचे लक्षात येऊ लागल्यावर, तसेच केंद्राबाबतचा घोळ असल्याने काही अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली. पुन्हा साडेतीननंतर मतदारांनी केंद्रांवर रांगा लावल्या. सकाळी साडेनऊपर्यंत ७ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत १२.४३ टक्के, दीड वाजेपर्यंत २४ टक्के, तर साडेचार वाजेपर्यंत ४०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Polling in Thane increased by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.