ठाण्यात तीन ठिकाणी लवकरच पोटनिवडणुका होणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:00+5:302021-02-16T04:41:00+5:30

कळव्यात बिनविरोध तर दोन ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता ठाणे : ठाणे महापालिकेत तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका जाहीर होण्याची ...

By-polls to be held soon in three places in Thane | ठाण्यात तीन ठिकाणी लवकरच पोटनिवडणुका होणार जाहीर

ठाण्यात तीन ठिकाणी लवकरच पोटनिवडणुका होणार जाहीर

Next

कळव्यात बिनविरोध तर दोन ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता

ठाणे : ठाणे महापालिकेत तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका जाहीर होण्याची चिन्हे असून यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकांच्या आवश्यक कामांसाठी निविदादेखील प्रसिद्ध केल्या आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी आणि भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे निधन, तसेच मुंब्र्यातील नगरसेविका हसीना शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. २०२२ मध्ये ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे असल्याने पोटनिवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या सदस्याला केवळ आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

मुकुंद केणी यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. कळव्यात केणी कुटुंबीयांचे प्राबल्य असल्याने या ठिकाणी त्यांचे पुत्र मंदार केणी उभे राहण्याची शक्यता असून ते बिनविरोध निवडून येण्याची चिन्हे आहेत. मुकुंद केणी यांच्या पत्नी प्रमिला केणी यांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यापूर्वी विरोधी पक्षनेते पद भूषविले असून केणी कुटुंबीयांचे सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना ही पोटनिवडणूक अधिक सोपी जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. कांबळे हे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात निवडून आले होते. त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असून, या ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. मुंब्र्याच्या एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका हसीना शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लावण्यात येणार आहे. या ठिकाणीदेखील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून यासाठी पूर्वतयारीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर या कामांच्या निविदा काढल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

Web Title: By-polls to be held soon in three places in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.