जीन्स कारखान्यांना प्रदूषण मंडळाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:17 AM2018-02-12T01:17:06+5:302018-02-12T01:17:15+5:30
उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर कारवाई झाल्यावर या ठिकाणी असलेले जीन्स उद्योग जवळील शहरात आसरा घेत आहेत. अंबरनाथमधील बुवापाडा भागात नव्याने सुरू केलेल्या जीन्स कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. तर पालिका प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
अंबरनाथ : उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यांवर कारवाई झाल्यावर या ठिकाणी असलेले जीन्स उद्योग जवळील शहरात आसरा घेत आहेत. अंबरनाथमधील बुवापाडा भागात नव्याने सुरू केलेल्या जीन्स कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. तर पालिका प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
वालधुनी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्यावर उल्हासनगर महापालिकेने शहरातील सर्व जीन्स कारखान्यांवर कारवाई केली. जीन्स वॉश करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिल्याने आता या ठिकाणी असलेले उद्योग अन्यत्र स्थलांतरीत होत आहेत. त्यातील काही उद्योग हे बुवापाडा भागात आले आहेत. त्यांनी या भागात जीन्स वॉश करण्याचा कारखाना देखील उभारला आहे. या जीन्स कारखान्यांवरून कारखानदार आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वादही झाले होते. मात्र तरीही कारखाने सुरूच राहिले आहेत.
बुवापाडाप्रमाणेच महेंद्र नगर, खामकरवाडी या भागातही असे कारखाने सुरू करण्यात आले. या सर्व जीन्स कारखान्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्यांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांचे वीज आणि पाणी जोजणी तोडण्यासाठी पत्र दिले आहे. तर दुसरीकडे अंबरनाथ पालिकेनेही त्यांच्या स्तरावर या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. कारखाने बंद न केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
उल्हासनगमधून अनेक जीन्स उद्योग हे अंबरनाथ शहर आणि ग्रामीण भागात स्थिरावले आहेत.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
प्रदूषण मंडळाकडून किमान या उद्योगांची पाहणी करून त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हे उद्योग बंदच झाले पाहिजे अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे. या उद्योगासाठी स्थानिकांनी भाडेतत्वावर जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. तर वॉश केलेले जीन्स सुकण्यासाठी खुल्या जागेवर टाकू नये असे आवाहन नागरिक करत आहेत.