तारापूरच्या तीन उद्योगांवर प्रदूषण मंडळाची उत्पादन बंदची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:50 AM2021-01-08T00:50:30+5:302021-01-08T00:51:00+5:30
पर्यावरणाचे कायदे बसविले होते धाब्यावर : सर्वेक्षणानंतर कारवाई सुरु
पंकज राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील तीन रासायनिक उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. सदर तिन्ही उद्योगांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या समितीच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या उद्योगांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अजून अनेक उद्योगांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे २५० उद्योगांचे सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात केले असून त्यामध्ये पर्यावरणाचे नियम व अटी धाब्यावर बसविणाऱ्या उद्योगांवर उत्पादन बंद तर काही उद्योगांवर प्रपोज डायरेक्शनच्या नोटीस बसविण्यात आल्या आहेत. प्लॉट नंबर २१ /२२/ १मधील आरती ड्रग्स लिमिटेड, प्लॉट नंबर टी-८ मधील एम्मार केम इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड तर प्लॉट नंबर एन-८१ मधील दैनिक सरफेस केमिकल प्रा. लिमिटेड या तीन उद्योगांवर उत्पादन बंद, तर सुभाश्री केमिकलला प्रपोज डायरेक्शनची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी चर्चा आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात उद्योगांतील सांडपाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांमध्ये केमिकल्स ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याने तसेच ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित नसणे, हाय सीओडी व हाय टीडीएसच्या एमफ्लुएंटची वाहतूक करणाऱ्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम न बसविणे, घातक रसायने मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे वेळच्या वेळी न पाठविणे, झिरो डिस्चार्ज कंसेंट असूनही १०० टक्के सांडपाणी रिसायकल न करणे अशा विविध कारणांमुळे या उद्योगांवर वेगवेगळे दोषारोप ठेवून उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली.