ठाण्यात प्रदूषण घटले ; मात्र वाहनखरेदी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:39 AM2021-01-03T01:39:05+5:302021-01-03T01:39:11+5:30

७९,६३२ नवी वाहने : ६५,५१६ दुचाकींचा समावेश

Pollution decreased in Thane; However, vehicle purchases increased | ठाण्यात प्रदूषण घटले ; मात्र वाहनखरेदी वाढली

ठाण्यात प्रदूषण घटले ; मात्र वाहनखरेदी वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषणात घट झाली असली, तरी दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच रेल्वे आजही बंद असल्याने त्यामुळे वाहन खरेदी वाढल्याचे समोर आले आहे. शहरात आजघडीला २२ लाख १७ हजार ६९९ वाहने असून, त्यामध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. त्यांची संख्या तब्बल १२ लाख ८२ हजार ६९९ इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७९ हजार ६३२ वाहनांची अधिक भर पडली आहे, तर यंदा नव्याने दुचाकीमध्ये ६५ हजार ५१६ भर पडली आहे.


एकीकडे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू झाले आहे, परंतु अद्यापही वाहनचालक किंवा नागरिक इलेक्ट्रिक वाहनांना अधिकचे महत्त्व देताना दिसत नाही. त्याचीही कारणे तशीच आहेत. चार्जिंग स्टेशनचा मुद्दा असल्याने ती अधिक प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही. दरम्यान, दुसरीकडे यंदा लॉकडाऊनमुळे हवा, ध्वनिप्रदूषणात कमालीची घट झाली आहेते, परंतु दुसरीकडे आजही रेल्वेसेवा सर्वसामान्यांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचा कल खासगी वाहनांकडे अधिक असल्याचे दिसून आले. एसटी किंवा इतर प्राधिकरणांच्या सेवा जरी सुरू असल्या, तरी त्यातूनही काहीशी भीती आजही नागरिकांच्या मनात आहे. 
त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची वाहने वापरुन कामाच्या ठिकाणी जाण्यास अधिक पसंती दिली आहे. त्यामुळेच आता ठाण्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडीतही भर पडली आहे.

ठाण्यात २२ लाख वाहने
आजघडीला ठाण्यात २२ लाख १७ हजार ६९९ वाहने आहेत. मागील वर्षी याच कालावधीत शहरात २१ लाख ३८ हजार ६७ वाहनांची खरेदी झाली होती. यंदा त्यात ७९ हजार ६३२ नव्या वाहनांची भर पडली आहे, तर मागील वर्षी शहरातील रस्त्यांवर १२ लाख १७ हजार १८३ दुचाकी धावत होत्या. यंदा त्यात ६५ हजार ५१६ नव्या दुचाकींची भर पडली असून, आजघडीला १२ लाख ८२ हजार ६९९ दुचाकी धावत असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.

रिक्षा, ॲम्ब्युलन्सची संख्या वाढली 
मागील वर्षी शहरातील रस्त्यांवर १ लाख १८ हजार ४१९ रिक्षा धावत होत्या. यंदा त्यात काहीशी वाढ होऊन शहरात एक लाख २५ हजार ३९ रिक्षा धावत आहेत.
मागील वर्षी १,७९५ ॲम्ब्युलन्स होत्या. यंदा त्यातही काहीशी वाढ होऊन आता १,८४२ ॲम्ब्युलन्स झाल्या आहेत. काेराेनामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Pollution decreased in Thane; However, vehicle purchases increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.