परप्रांतीयांकडून तलावाचे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:21 AM2018-04-25T05:21:57+5:302018-04-25T05:21:57+5:30
मनविसेचा आरोप : भार्इंदर पालिकेकडे केली तक्रार, जलचरांना निर्माण झाला धोका
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिमीरा परिसरातील काशिगाव येथे बांधलेल्या जरीमरी तलावाचा परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे तलावातील जलचरांना धोका निर्माण होणार असल्याने प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) शहर सचिव शान पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे.
पालिकेने १० वर्षापूर्वी काशिगाव येथील तलावाच्या भोवताली उद्यान बांधून तलावाला सुरक्षित केले. या तलावाचे पाणी शहरातील दुभाजक व पदपथाजवळच्या झाडांना दिले जाते. या तलावात मोठ्या संख्येने मासे असून या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या उद्यानामुळे काशिगाव परिसराची शोभा वाढली आहे. मात्र या तलावात येथील काही परप्रांतीय बिनधास्त आंघोळ करून तेथेच कपडे धुतात. तर काही महाभाग या तलावातील पाण्याने आपापली वाहनेही धूत असल्याने तलावातील पाण्याची पातळी खालावून त्याच्या गैरवापरामुळे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे.
या तलावात गणपती, गौरी व नवरात्रीतील देवींच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे त्यात प्रदूषणाची पातळी वाढत असली तरी परप्रांतीयांच्या गैरवापरामुळे त्यात भर पडत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने हा गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशा प्रदूषणामुळे भार्इंदर पश्चिमेकडील मांदली प्रभाग समिती ३ येथील तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडतात.
यंदा त्यात जरीमरी तलावाची भर पडणार असल्याचा दावा करत मनविसेने तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणाºयांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मनविसेचा आंदोलनाचा इशारा
तलावातील पाण्याचा गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे २४ तास सुरक्षारक्षक तैनात करावा, अशी मागणी पवार यांनी सरकारी पोर्टलद्वारे पालिकेकडे केली आहे. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना पत्रव्यवहार करीत जरीमरी तलावासाठी त्वरित सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. त्यावर उपायुक्तांनी आस्थापना विभागाला निर्देश दिले असले तरी तलावातील पाण्याच्या गैरवापराला अद्याप आळा न घातल्याने त्याचे प्रदूषण अद्याप सुरुच असल्याचा दावा करत पवार यांनी प्रशासनाने हा प्रकार न थांबवल्यास आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.