लॉकडाऊनमुळे प्रदूषण थांबले, आता प्रदूषणकारी कंपन्या डोंबिवली एमआयडीसीत नकोच, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 11:29 AM2020-05-19T11:29:09+5:302020-05-19T11:29:38+5:30
प्रदुषण करणाऱ्या सर्व कंपन्या बंदच ठेवा, कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, डोंबिवलीत वारंवार प्रदुषणाच्या त्रासाने डोंबिवलीकरांना श्वसना संबंधी आजार होतंच असतात हे सिध्द झाले आहे, कोरोनाच्या ह्या संकटात अश्या प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना जर लाॅक डाऊन कालावधीत परवानगी दिली तर ह्या कंपन्या प्रदुषण करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही
डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्रदूषणकारी कंपन्यांनी मोठा हाहाकार परिसरात माजवला होता.मात्र लॉकडाऊन मध्ये कंपन्या बंद असल्याने प्रदूषण थांबले,होणारे स्फोट थांबले. डोंबिवली मध्ये हिरवा पाऊस तर कधी ऑइल मिश्रीत पाऊस , गुलाबी रस्ता अश्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवावर उठलेल्या कंपन्यांना परवानगी देऊच नका अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटद्वारे केली आहे.
कदम यांनी पत्रात आणि ट्विट द्वारे सांगितले की प्रदुषण करणाऱ्या सर्व कंपन्या बंदच ठेवा, कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, डोंबिवलीत वारंवार प्रदुषणाच्या त्रासाने डोंबिवलीकरांना श्वसना संबंधी आजार होतंच असतात हे सिध्द झाले आहे, कोरोनाच्या ह्या संकटात अश्या प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना जर लाॅक डाऊन कालावधीत परवानगी दिली तर ह्या कंपन्या प्रदुषण करणार ह्यात तीळ मात्र शंका नाही, आपण नुकतीच डोंबिवली एमआयडीसी परिसराला भेट दिलेली होतीच, व त्या नुसार आपण प्रामाणिकपणे व्यवसाय करा किंवा टाळे लावा असा आदेश देवून चौकशी समिती बसवलेली होतीच त्याचा अहवालही आपणाकडे असुन त्यानुसार बऱ्याच कंपन्यांना दंड आकारलेला आहे, अश्या कंपन्यांना ह्या लाॅक डाउन कालावधीत परवानगी देवूच नये ही अपेक्षा आहे, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे, डोंबिवली रेड झोन मधे असल्याने नागरीक भयभीत आहेत, प्रदुषणावर जर श्वसनाचा त्रास झाला तर खाजगी रूग्णालये पण डोंबिवलीकरांना कोविड रूग्णालयात पाठवतील व डोंबिवलीकरांसाठी हा चिंतेचा विषय होईल.
मेट्रोपॉलीटिन एक्सिम या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगी संदर्भात कदम म्हणाले की, त्या रासायनिक कंपनीला फेब्रुवारी महिन्यात मोठी आग लागली होती. आगीने काही काळातच भीषण रूप धारण केले . रसायन भरलेल्या ड्रम आग लागून त्यांचे एकामागोमाग एक असे 70 स्फोट होत राहिले व धुराचे लोळ आकाशात उडत होते. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग लावली की लागली हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे तर दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याची माहिती सुद्धा देण्यात आली नाही असेही कदम म्हणाले.