ठामपा बांधणार देसाई खाडीवर पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:34 AM2018-11-25T00:34:03+5:302018-11-25T00:34:19+5:30
दिव्यातील रस्तेही सुसाट : ५६ कोटींचा खर्च अपेक्षित
ठाणे : दिवा स्टेशन पूर्वपासून आगासनगाव ते देसाईगाव ते शीळ-कल्याण रस्त्यापर्यंत महापालिकेने विकास आराखड्यात रस्ते दर्शवले आहेत. त्यानुसार, त्यांचे तीन भागांत रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. आगासन गाव येथे जोडणी होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे व पुलाचे बांधकाम झाल्यावर खिडकाळी, देसाई, पडले, आगासन, सागर्ली या गावांना दिवा स्टेशनपासून जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यानुसार, देसाई खाडीवर पूल बांधण्यात येणार असून येथील दोन्ही बाजंूचे जोडरस्त्यांचेही काम केले जाणार आहे. यासाठी ५६.०४ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
यासाठी पुलाचे आराखडे तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, टेंडर प्रक्रिया करून इतर भौगोलिक माहिती जमा करणे तसेच आवश्यक तांत्रिक डाटा जमा करणे, सीआरझेडकडून परवानगी मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे. त्यानंतर अहवान प्राप्त करून घेतला जाणार आहे. त्यानंतर, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
एकूणच देसाई खाडीवरील पूल हा १८० मीटर लांबीचा असणार असून त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १५० मीटर लांबीचे अॅप्रोच रस्ते बांधण्यात येणार आहे. त्यानुसार, या कामासाठी ५६.०४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तर, २०१८-१९ मध्ये पाच कोटी आणि २०१९-२० मध्ये २५ कोटी आणि २०२०-२१ मध्ये २६.०४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
एकूणच यामुळे येथील गावांना या रस्ता रुंदीकरणामुळे आणि खाडीपुलामुळे फायदा होणार असून वेळेची बचत होणार आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही जोडरस्त्यांची निविदा काढली जाणार आहे. त्यानंतर, पुलाचे काम प्रस्तावित केले जाणार आहे.