डोंबिवली स्थानकातील पूल जूनपर्यंत पाडणार, कल्याण दिशेकडील पूल कमकुवत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:33 AM2019-03-20T03:33:55+5:302019-03-20T03:34:33+5:30
सर्वाधिक गर्दीचे अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला पादचारी पूल कमकुवत झाला आहे.
डोंबिवली - सर्वाधिक गर्दीचे अशी ख्याती असलेल्या डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला पादचारी पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा पूल लवकरात लवकर पाडून नवीन बांधण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, हा पूल जून अखेरपर्यंत पाडण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांनी मधल्या प्रशस्त रुंद पुलाचा वापर करावा, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.
डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पुलाचा वापर रेल्वे प्रवाशांबरोबरच पूर्व-पश्चिमेला ये-जा करणारे नागरिकही करत आहेत. मात्र, या पुलाची रुंदी अवघी ४.८ मीटर असल्याने तो अपुरा ठरत आहे. एका वेळी अनेक फलाटांवर लोकल आल्यास या पुलावर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे.
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पूल दूर्घटनेनंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवाशांसमवेत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी या पुलावरून प्रवाशांना ये-जा करायला लावू नका, असे आदेश स्थानक प्रबंधकांना दिले होते. त्यानंतर अवघे १५ दिवस रेल्वे प्रशासनाने उद्घोषणा करून प्रवाशांना आवाहन केले. मात्र, त्यानंतर उद्घोषणा बंद झाल्याने पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. अलिकडच्या मुंबईतील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कमकुवत पूल पाडावा, अशी मागणी डोंबिवलीतील प्रवाशांकडून जोर धरत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर जैन म्हणाले, जून अखेरपर्यंत हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यावर यंत्रणेचा असणार आहे. मात्र, नवीन पूल कधीपर्यंत बांधणार, असे विचारले असता त्यांनी आता त्याचे कोणतेही नियोजन नाही. पुढील काही दिवसांत त्यासंदर्भात भाष्य करणे उचित ठरेल, असे स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. मात्र, हा पूल लवकरात लवकर पाडावा. जूनपर्यंत वाट बघू नये, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने व्यक्त केली आहे.
नवीन पूल सहा मीटर रुंदीचा
कल्याण दिशेकडील नवीन पूल सहा मीटर रुंदीचा असणार आहे. स्कायवॉकची रुंदीही तेवढी असल्याने तो योग्य पद्धतीने सांधला जाईल. त्यामुळे पुलावर गर्दीच्या वेळेत चेंगराचेंगरी होणार नाही. जास्तीच जास्त नागरिक ये-जा करून शकतील.
‘ते’ पूल लवकरच पाडणार
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी मंगळवारी कळवले की, मध्य रेल्वेवरील कुर्ला, भांडूप, विक्र ोळी, दिवा, कल्याण स्थानकातील पादचारी पूल आठवड्यानंतर विशिष्ट अंतराने पाडण्यात येणार आहेत. या पुलांच्या वयोमानानुसार ते कसे व कधी पाडायचे, याचे नियोजन करणे सुरू आहे. त्यानुसार लवकरच माहिती कळवली जाईल. या कामाच्या निविदा निघाल्या आहेत.