अनगाव ग्राम पंचायत हद्दीतील गताडी पाडा स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:04 PM2020-08-13T20:04:43+5:302020-08-13T20:14:59+5:30
विशेष म्हणजे गेल्या वर्ष भरा पूर्वी लाखो रुपये खर्च करून डागडूगीचे काम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अनगाव ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गताडी पाडा येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे . त्यामुळे येथील नागरिकांना अंत्यसंस्कार करतांना मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्ष भरा पूर्वी लाखो रुपये खर्च करून डागडूगीचे काम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने भिंतीचे प्लास्टर उखडले असून छतावरील पत्रे ही तुटलेल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
अनगाव ग्राम पंचायतीत ग्राम पंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्राम पंचायत हद्दीतील अनेक कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आल्याचे आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत असताना ग्राम पंचायत परिसरातील गताडी पाडा येथे गेल्या वर्षी चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून स्मशान भूमीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र पंचायत समितीच्या शाखा अभियंता , ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे या स्मशान भूमीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने येत्या पावसाळ्यात सिमेंट ने तयार केलेली फुटीग व भीतीचे प्लास्टर निखळून पडल्याचे दिसत आहेत तर छतावरील पत्रे फुटल्याने अत्यंविधी साठी आणलेले लाकडे भिजत असल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पडला असून संबधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे ते अत्यंत निकृष्ठ असल्याने या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा हा प्रकार असून सध्या येथील स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारासह अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व मनसेचे विभाग प्रमुख गिरीष देव यांनी केली आहे .