पाणीयोजनांमुळे विहिरींची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:55+5:302021-03-08T04:37:55+5:30
वासिंद : ग्रामीण व काही शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त असलेल्या विहिरी आता अखेरच्या घटका मोजत आहेत. नवीन पाणीयोजनांमुळे ...
वासिंद : ग्रामीण व काही शहरी भागात पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त असलेल्या विहिरी आता अखेरच्या घटका मोजत आहेत. नवीन पाणीयोजनांमुळे या विहिरी दुर्लक्षित होऊन त्यांची पडझड झालेली आहे. या विहिरीतील पाणीही आरोग्यास अपायकारक ठरत आहे.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांचे राहणीमान आरामदायी झाले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तसेच इतर योजनांर्तगत खेडोपाडीही अनेक पाणीयोजना कार्यान्वित होऊन घरोघरी पाणी पोहोचले आहे. यामुळे गावाबाहेर असलेल्या गावठाण व शहरातील काही विहिरींचा पाण्यासाठी असलेला वापर शक्यतो होत नाही. गावठाणातील विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, गवत, इतर झाडझुडपे वाढून तर शहरी विहिरींमध्ये घाण, कचरा इतर साहित्य पडून पाणी अशुद्ध झाले आहे.
पूर्वी मोजक्याच आणि गावापासून कोसोदूर असलेल्या विहिरींमुळे महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती व्हायची. परंतु बोअरवेल, नद्यांवरील पाणी योजनांमुळे घरोघरी पाण्याची सोय झाल्यामुळे महिलांसाठी सोयीचे झाले. ही व्यवस्था झाल्याने महिलांना पाण्यासाठी होणारा त्रास संपला. हे आनंददायी असले तरी नैसर्गिक स्रोत असलेल्या व लोप पावत चाललेल्या विहिरींची ओळख जोपासणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहासजमा विहिरी या विद्यार्थ्यांना आकृतीप्रमाणे शिकवाव्या लागतील, असे आस्था महिला विकास प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा मानसी गायकर यांनी सांगितले.