अंत्यसंस्कारासाठी गरिबांना मिळणार मोफत लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:31 AM2021-02-13T01:31:08+5:302021-02-13T01:31:22+5:30
स्मशानभूमी ट्रस्टीचा निर्णय; महापालिकेने दिली प्रलंबित बिले
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने लाकडाची प्रलंबित बिले दोन दिवसांपूर्वी दिल्याने स्मशानभूमी ट्रस्टीने गोरगरिब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लाकडाचे दर वाढल्याने मोफत लाकडे देताना अल्प शुल्क आकारात असल्याची कबुली शांतीनगर भूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली आहे. गेल्या रविवारी या संदर्भात ‘लोकमत’ने ‘... आम्ही ती स्मशाने, ज्यांना लाकडेही न मिळाली’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेने प्रलंबित बिले दिली.
उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू नागरिकांना आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून मोफत लाकडे देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. एका अंत्यसंस्कारामागे महापालिका स्मशानभूमी ट्रस्टीला १ हजार रुपये देत असून, हा जुनाच दर आजही कायम आहे. दरमहा ३५० ते ४०० पेक्षा जास्त अंत्यसंस्कार शहराच्या चार स्मशानभूमींत होत असून, ७० टक्के नागरिक पालिकेच्या मोफत लाकडाच्या योजनेचा लाभ घेत आहेत. लाकडाच्या किमती वाढल्याने दरात वाढ करण्याची मागणी स्मशानभूमी ट्रस्टीने महापालिकेकडे केल्याची माहिती लुंड यांनी दिली. एका अंत्यसंस्कारामागे ट्रस्टीला एकूण १,७०० ते १,८०० रुपये खर्च येतो, तर महापालिका फक्त लाकडाचा १ हजार रुपये खर्च देते.
दरम्यान, चार महिन्यांपासून महापालिकेने लाकडाची बिले दिले नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्टीने मोफत लाकडे देण्यास टाळाटाळ केली.
या प्रकाराने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला, तसेच स्मशानभूमीत लाकडे ओली, तसेच मोठ्या आकाराची असल्याने इतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महापालिकेचे धाबे दणाणले. उपायुक्त मदन सोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीचे प्रलंबित बिले दिल्याची माहिती दिली, तसेच लाकडाचे दर वाढल्याने वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करून वाढीव निधी देण्याचे संकेत दिले. लुंड यांनीही प्रलंबित बिले मिळाली, असे ते म्हणाले.
स्मशानभूमी ट्रस्टीला करावा लागतो जास्त खर्च
एका अंत्यसंस्कारासाठी १,७०० ते १,८०० रुपये तर लाकडावर १,२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. महापालिका फक्त एका अंत्यसंस्कारामागे हजार रुपये देत, असल्याने नाईलाजाने नागरिकांना अल्प शुल्क आकारावा लागतो. ट्रस्टीला स्मशानभूमीची देखभाल, पाणी, वीजबिल, माळीचा खर्च, अंत्यसंस्कार करणाऱ्यांचा पगार आदी खर्च ट्रस्टीला करावा लागत असल्याचे मेघराज लुंड यांचे म्हणणे आहे.