बोगस जात दाखल्याबद्दल पोसरी सरपंचावर खटला
By admin | Published: April 27, 2017 11:55 PM2017-04-27T23:55:03+5:302017-04-27T23:55:03+5:30
‘मराठा’ असूनही ओबीसीच्या सवलती लाटण्यासाठी ‘हिंदू कुणबी’ असा जातीचा बनावट दाखला मिळविल्याबद्दल अंबरनाथ तालुक्यातील
मुंबई: ‘मराठा’ असूनही ओबीसीच्या सवलती लाटण्यासाठी ‘हिंदू कुणबी’ असा जातीचा बनावट दाखला मिळविल्याबद्दल अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर बळीराम ठाकरे यांचे पद तर गेलेच पण त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी खटलाही चालणार आहे.
ज्ञानेश्वर ठाकरे यांनी या जातीच्या दाखल्यावर पोसरी ग्रामपंचायतीची निवडणूक राखीव उमेदवार म्हणून लढविली होती. नंतर ते सरपंच झाले. खोणी गावातील पिंटू मोतीराम व अभिमन्यू मोतीराम या दोन म्हात्रे बंधूनी केलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईतील जातपडताळणी समितीने ज्ञानेश्वर ठाकरे यांचा जातीचा दाखला रद्द करून त्यांच्यावर लबाडीचा खटला भरण्याचा निकाल गेल्या वर्षी २ एप्रिल रोजी दिला होता.
याविरुद्ध ठाकरे यांनी गेल्या जुलैमध्ये याचिका केली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना तोपर्यंत अपात्र घोषित केले नसेल तर तूर्तास ती कारवाई करू नये, असा आदेश सुरुवातीस दिला होता. आता अंतिम सुनावणीनंतर न्या. नरेश पाटील व न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने ठाकरे यांची याचिका फेटाळली व जात पडताळणी समितीचा आदेश कायम केला.
न्यायालयाने केवळ जात पडताळणी समितीच्या कामकाजावर विसंबून न राहता ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचे शालेय रेकॉर्ड मागवून घेऊन स्वत: तपासले आणि ठाकरे यांची खरी जात हिंदू मराठा अशी आहे व त्यांनी ‘हिंदू कुणबी’ असा मिळविलेला जातीचा दाखला बनावट आहे, असा नि:संदिग्ध निष्कर्ष नोंदविला. या सुनावणीत ठाकरे यांच्यासाठी अॅड. विजय किल्लेदार यांनी, सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील आर. ए. साळुंके यांनी तर मूळ तक्रारदार म्हात्रे यांच्यासाठी अॅड. विशाल पाटील यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)