तृतीयपंथींच्या शिक्षणासाठी सकारात्मक पाऊल; ‘वरदा’चा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:53 PM2019-06-29T23:53:31+5:302019-06-29T23:54:00+5:30
वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे.
- जान्हवी मोर्ये
कल्याण : वरदा महिला बहुउद्देशीय संस्थेने पत्रीपूल परिसरातील तृतीयपंथींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले आहे. त्याकरिता त्यांची नुकतीच एक कार्यशाळा घेतली. शिक्षण घेण्यास प्रथम तृतीयपंथी उत्सुक नव्हते. परंतु, संस्थेच्या वरदा जोशी यांनी त्यांचे समुपदेशन केल्यानंतर जवळपास ४० तृतीयपंथींनी शिक्षणाची तयारी दाखवली आहे.
वरदा संस्था राज्यभरात ज्ञानदानाचे काम करत असून, तिला एसएनडीटीची मान्यता आहे. आजही तळागाळातील नागरिकांपर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. काही महिलांचे शिक्षण अनेक कारणास्तव अर्धवट राहिले आहे. त्यामुळे त्यांना ते घेता यावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. कल्याण-डोंबिवलीत ही संस्था २०१३ पासून कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत ३०० महिलांना शिक्षण दिले असून, त्यात १५ नगरसेविकाही आहेत. संस्था आता महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा चौधरी यांच्या सहकार्याने तृतीयपंथींना शिक्षण देणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तृतीयपंथींना सर्व अधिकार आहेत. महिला धोरणात शैक्षणिक अधिकार, कौशल्य विकास किंवा घरकुल योजना असे अधिकार दिले आहेत. वयस्क तृतीयपंथींनाच आता शिकून उपयोग काय, असे वाटत होते. पण, त्यांना तुम्हाला आत्मसन्मान मिळेल, असे समजून सांगितल्यावर हे सर्वजण शिक्षणासाठी तयार झाले. वयस्क तृतीयपंथींना सही करता येईल, इथपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.
आठवड्यातून दोनदा देणार प्रशिक्षण
केवळ शनिवार व रविवारीच दोन तास त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका तृतीयपंथीचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. तर, दुसऱ्याचे बी.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यामुळे त्याला पुढे बँकिंगच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला आहे. या सर्व तृतीयपंथींना प्रवेश परीक्षा देऊन पुढील शिक्षण घेता येणार आहे. तृतीयपंथींना वर्षा कमलाकार, वरदा जोशी, अपूर्वा जोशी, अर्पिता जोशी, संगीता मुंडल्ये, अश्विनी भिडे प्रशिक्षण देणार आहेत.