सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग: शाळकरी कवींना झिम्माड फेसबुक लाईव्हने दिला मंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 04:39 PM2018-07-12T16:39:30+5:302018-07-12T16:41:30+5:30
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासुन दार असावे अशी ओरड सर्वत्र केली जाते, पण झिम्माडने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी कवितेचा मंच उपलब्ध करून दिला आहे.
ठाणे : एरव्ही सोशल मिडियाच्या वापरावर आळा घालावा का अशी चर्चा होत असताना झिम्माड या काव्य समाजसमुहाने याच्या सकारात्मक उपयोगाचे एक नवे उदाहरण सोशल मिडियाच्या विश्वात निर्माण केले आहे. या समाज समुहाने शाळकरी कवींना कवितेचा ऑनलाईन मंच उपलब्ध करून दिला. सहभागी विद्यार्थी कवींना फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काव्यरसिकांपर्यंत पोहोचता आले.
झिम्माड काव्य समाज समुहाने पाऊस ही मध्यवर्ती संकल्पना घेत 'वेडा झाला पाऊस' या शीर्षकांतर्गत "पाऊसशाळा" हा पाऊस कविता व गप्पांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सादर केला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता हे या फेसबुक लाईव्हचं विशेष आकर्षण होतं. शाळेत जाणारी आजची पिढी किती वेगळ्या पद्धतीने पावसाचे अनुभव कवितेतून मांडत आहे याचा प्रत्यंतर पाऊसशाळा फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून आला. अनुष्का कदम,अनुजा कांबळे, श्रृती साळवी, प्रतिक्षा लोखंडे, साहिल तौर ही मुलं सुभाषनगर एज्युकेशन सोसायटीचे स्वामी मुक्तानंद हायस्कूल, चेंबूर या शाळेतली आहेत. या शाळकरी कवींनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या कविता सादर केल्या. सोशल मिडियाच्या जगात विद्यार्थ्यांसाठी असा साहित्यिक उपक्रम पहिल्यांदाच झिम्माडने घडवून आणला आहे. या कार्यक्रमात बालसाहित्य लेखक, कवी एकनाथ आव्हाड यांनी लहान मुलांच्या भावविश्वातल्या पावसाची विविध रूपे कवितेतून रसिकांना उलगडून दाखवली. सोशल मिडियाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून ऋतुरंग, बोलू कवतिके इ. ऑनलाईन उपक्रम सातत्याने झिम्माड काव्य समाजसमूह करत असतो. शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता वाचनाचा ऑनलाईन उपक्रम राबवत सोशल मिडियाच्या जगात झिम्माडने आपला वेगळा ठसा उमटवला आहे, असे झिम्माड काव्य समूह संचालक वृषाली विनायक यांनी सांगितले. झिम्माड संचालक मंडळ राज असरोंडकर, सुदेश मालवणकर, प्रफुल केदारे तसंच तंत्र सहाय्यक निनाद असरोंडकर यांचाही या उपक्रमात मोलाचा वाटा आहे.