कर्नाटकातून आणलेले वन्यजीव ताब्यात; आरोपीस ठाण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:18 AM2019-12-11T02:18:09+5:302019-12-11T02:18:34+5:30
ससाणा, घार, गरूड, कासवाचा समावेश, वनविभागाची कारवाई
ठाणे : बंगळुरु येथून मुंबईत वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आणि इंडियन स्टार कासव विक्रीसाठी आलेल्या कर्नाटक राज्यातील मोहम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान (२४) याला ठाणे वनविभागाने मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकातून अटक केली. त्याच्याकडून चार कासव आणि पाच ससाणे, घार आणि घुबड आदी पक्ष्यांना ताब्यात घेतले आहे. या पक्ष्यांना आकाशात संचार करता येईल, यासाठी त्यांना मुक्त करण्याबाबत बुधवारी ठाणे न्यायालयाकडे परवानगी मागण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पक्ष्यांना मुक्त संचार करण्यासाठी आकाशात सोडले जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली.
कोर्इंबतूर -कुर्ला ट्रेनने एक जण वन्यपक्षी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कोर्इंबतूर -कुर्ला ट्रेनच्या एस-१ बोगीची तपासणी केली. त्यावेळी पुठ्ठ्याच्या तीन बॉक्समध्ये पक्षी आणि कासव आढळून आले. हे पक्षी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अनुसूची ४ मधील संरक्षित वन्यपक्षी आहेत. यांची खरेदी, विक्री करणे, बाळगणे, पाळणे यास वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार बंदी आहे.
आरोपी मोहम्मद खान याने हे वन्यजीव बंगळुरु येथून घेतल्याचे तो सांगतोय. या प्रकरणात त्याचे काही साथीदार असण्याची शक्यता असून, त्यांचाही शोध सुरू आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरजा देसाई-पाटील, ठाणे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, मनोज परदेशी, हेमंत कारंडे, कुडाळकर, वनरक्षक संदीप मोरे, प्रवीण आव्हाड, जाधव, पाटील यांच्या पथकाने केली. वन्यजीवविषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन विभागाचे वनक्षेत्रपाल मुठे यांनी केले.
लवकरच करणार मुक्त
आरोपीकडून हस्तगत केलेल्या पक्ष्यांना मुक्त संचार करण्यासाठी सोडण्याची परवानगी न्यायालयाकडून घेण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर त्यांना मुक्त करणार असल्याचे वनविभागाने सांगितले.