लॉकडाऊनच्या शक्यतेने दुकानांमधील नोकर निघाले गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:32+5:302021-04-12T04:37:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन लांबलाच तर पुढे शहरात राहून करायचे काय? पोटाची खळगी कशी भरायची? असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन लांबलाच तर पुढे शहरात राहून करायचे काय? पोटाची खळगी कशी भरायची? असा सवाल आता बंद दुकानांच्या नोकर आणि मजुरांसमोर आहे. तूर्त तरी या नोकरदार वर्गाने गावाला जाऊ नये यासाठी मालकांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. पण लॉकडाऊन लांबलाच तर या नोकरांचा पगार तरी कसा करायचा? असा सवाल आता या व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
ठाणे शहरात सध्या वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे. तर सोमवार ते शुक्रवार या काळात जमावबंदी असल्यामुळे रात्री आठनंतर दुकाने बंदचे आदेश आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लॉकडाऊनबाबत अधिक कडक निर्बंध करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. पण सध्याच्या निर्बंधाबाबत पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाचे हाल होतात, असाही सूर आहे. सध्याचा लॉकडाऊन वाढणार की? त्यातही कडक निर्बंध लावले जाणार यात कोणतेच चित्र स्पष्ट नाही. किराणा दुकानांसह धान्य, कापड, मसाला, तेल अशा विविध दुकानांमधील नोकरांमध्येही संभ्रमावस्था आहे. त्याखालोखाल असलेले लोडर, हमाल तसेच वाहनचालक आणि क्लिनर अशा मजूर वर्गामध्येही सध्या भीतीचे वातावरण आहे. यातील बहुतांश मंडळी ही परप्रांतीय तसेच मुंबई आणि ठाण्याबाहेरील आहेत. त्यामुळे सध्याच्या ३० एप्रिलपर्यंत असलेला हा कडक निर्बंधांचा लॉकडाऊन लांबला किंवा सरसकट लॉकडाऊन केला तर मग ठाण्यात राहून करायचे काय? असा सवाल दुकानांमधील नोकर आणि मजूर वर्गांमध्ये आहे. त्यांच्यातील अनेकांना गावाला जाण्याचे वेध लागले आहेत. यातील काहींनी जाण्यास सुरुवातही केली आहे. गुढीपाडव्यासारखा सण विचारात घेता या नोकर मंडळींनी सध्या तरी गावाला जाऊ नये, असा आग्रह त्यांच्या मालक वर्गाने केल्याचे ठाणे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी शंक्कर ठक्कर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यातून लॉकडाऊन लागलाच तर त्याआधी दुकानांमध्ये गर्दी झालीच तर ती गर्दी सावरण्यासाठी विक्रेते आणि नोकरांचीही चणचण भासू शकते. त्यामुळेच तूर्तास तरी गावाला जाण्यापासून या मंडळींना रोखण्यात आल्याचेही अन्य एका व्यापाऱ्याने सांगितले. पण काही कारणास्तव लॉकडाऊन लागलाच तर काही महिने या नोकर मंडळींना पगार देण्याची तयारीही काही व्यावसायिकांनी केली आहे. मात्र एकदम चार ते पाच महिने त्यांचा पगार कसा देणार? अशीही चिंता आता व्यापाऱ्यांना सतावत असल्याचेही ठाण्यातील व्यापारी सांगतात.
अशी आहे नोकरांची संख्या
ठाणे शहरातील दुकाने - ६५०००
हमाल - ७५०००
नोकर - चार लाख
...........................
लॉकडाऊन लांबलाच तर पुढे काय होणार या चिंतेत दुकानांमधील अनेक नोकर मंडळी आहे. त्यातील काहींनी गावाला जाण्यासही सुरुवात केली आहे. अनेकांना काही काळ थांबण्याचा सल्लाही दिला आहे. पण, लॉकडाऊन झालेच तर दुकानातील नोकरच काय दुकान मालकांनाही घर कसे चालवायचे ही चिंता आहे.
शंकर ठक्कर, अध्यक्ष, अखिल भारतीय खाद्यतेल महासंघ