राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:50 AM2018-09-27T06:50:25+5:302018-09-27T06:50:33+5:30

महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीतील वाद उफाळून आला आहे. पक्षाचा व्हिप भाजपा आणि कलानीधार्जिणा असल्याची टीका याच पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे.

 The possibility of NCP's decision to fall on the path of liberation | राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीतील वाद उफाळून आला आहे. पक्षाचा व्हिप भाजपा आणि कलानीधार्जिणा असल्याची टीका याच पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे. व्हिप फेटाळून ज्योती भटिजा यांना मतदान करण्याचा निर्णय गंगोत्रीसह तीन नगरसेवकांनी घेतला असून राष्ट्रवादीतील हा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साई पक्षाच्या फुटीर गटाला न्यायालयाने मान्यता दिल्याचा दावा नगरसेवक टोणी सिरवाणी यांनी केला असून त्यामुळे भाजपासह ओमी कलानी गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी होऊ घातलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहे. ज्योती भटिजा यांना मतदान करण्याचा व्हिप राष्ट्रवादीचे गटनेते गंगोत्री यांनी पक्षाच्या नगरसेवकांना जारी केला होता. त्यावर पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नवीन व्हिप जारी करून नगरसेवकांना तटस्थ राहण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गंगोत्री यांनी पक्षावर तोंडसुख घेत पक्ष भाजपासह कलानीधार्जिणा झाल्याचा आरोप केला.
पालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक असून नगरसेवक सतरामदास जेसवानी हे कट्टर कलानीसमर्थक आहेत. गेल्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्या मोबदल्यात शिवसेनेने गटनेते भरत गंगोत्री यांना प्रभाग समिती क्रमांक-४ च्या सभापतीपदी निवडून आणले. याशिवाय, प्रभाग क्रमांक-१७ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून प्रचंड मतांनी निवडून आल्या.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे ओमी टीम आणि भाजपा उमेदवार पंचम कलानी यांचा पराभव होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरूनच पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा व्हिप जारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी यांच्याकडे पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी व्हिप दिल्यानंतर कलानीसमर्थकांनी रात्रीच व्हिपची प्रत गंगोत्री यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे संतापलेल्या भरत गंगोत्री यांनी आपणास पक्षाचा आदेश मान्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकूण ७९ नगरसेवकांपैकी बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे.
भाजपा-ओमी टीमचे ३१, साई पक्षाचे ५, काँगे्रस आणि भारिपचा प्रत्येकी १ तसेच राष्ट्रवादीच्या एका बंडखोर नगरसेवकासह एकूण ३९ नगरसेवक भजापाकडे आहेत. शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या फुटीर गटाकडे शिवसेनेचे २५, साई फुटीर गटाचे ७, रिपाइं-पीआरपी ३, राष्ट्रवादीचे ३ असे एकूण ३८ नगरसेवक आहेत. सद्य:स्थितीत भाजपा व ओमी टीम बहुमताकडे असली, तरी काँगे्रसच्या अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल यांच्यावर पक्षाचा दबाव वाढला आहे.

काँग्रेस, भारिपच्या नगरसेवकांकडे लक्ष
काँगे्रस पक्षाच्या नगरसेविका अंजली साळवे व भारिपच्या कविता बागुल भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाल्या आहेत. दोन्ही पक्षांची भूमिका भाजपाविरोधी असताना त्यांचे नगरसेवक भाजपाच्या डेºयात दाखल झालेच कसे, असा प्रश्न उभा ठाकला असून पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर दबाव येत आहे. भाजपा उमेदवाराला मतदान केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.

रिपाइं अध्यक्षाकडे भाजपाचे साकडे
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपाच्या पाठिंब्यावर केंद्रीय मंत्री झालेले रामदास आठवले यांना भाजपा व कलानीसमर्थकांनी साकडे घातल्याची चर्चा आहे. या पक्षाचे भगवान भालेराव आणि अपेक्षा भालेराव हे दोन नगरसेवक असून त्यांनी शिवसेनासमर्थक ज्योती भटिजा यांना पाठिंबा दिला आहे.

Web Title:  The possibility of NCP's decision to fall on the path of liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.