उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:40 PM2020-12-14T23:40:42+5:302020-12-14T23:40:47+5:30

अंतर्गत वाद; उपमहापौर भगवान भालेराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Possibility of vertical split in Ripai in Ulhasnagar | उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

उल्हासनगरात रिपाइंमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर :  देशासह राज्यात रिपाइं आठवले गटाची भाजपसोबत आघाडी असताना उल्हासनगर महापालिकेत पक्षाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केल्याने, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत रिपाइं आठवले गट भाजपऐवजी शिवसेना महाआघाडीसोबत आहेत. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना, भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत अनुक्रमे शिवसेनेच्या लीलाबाई अशान व रिपाइंचे भगवान भालेराव यांना मतदान केल्याने ते निवडून आले. स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक अनुमोदन दिले. एका भाजप सदस्याने समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने पाटील सभापतिपदी निवडून आले. शिवसेना महाआघाडीत रिपाइं असताना पक्षातील अनेकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत चर्चा केल्याने रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी आदींनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे प्रदेश सचिव नाना पवार, माजी अध्यक्ष राजू सोनावणे, माजी नगरसेवक शांताराम निकम, पक्षाचे नेते अरुण कांबळे, महेंद्र बच्छाव, गौरव धावरे, तुकाराम सोनावणे आदींसोबत चर्चा केली. पक्षाची राज्य व शहर कार्यकारिणी पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी बरखास्त केल्याने, या चर्चेत दम नसल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. पक्षाचे नेते व माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पक्षाची भाजपसोबत आघाडी असून शहर त्याला अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कार्यकारिणी बरखास्त केली असेल तर भालेराव शहराचे अध्यक्ष कसे काय, असाही सूर यानिमित्ताने काहींनी आळवला.

रिपाइंची शक्ती विखुरलेली?
शहर आंबेडकर आंदोलनाचे केंद्र असून रिपाइंची शक्ती मोठी आहे. मात्र रिपाइंची शक्ती अनेक गटातटांत विखुरली आहे. आठवले गटाची ताकद शहरात आहे. पक्षाचे ३ नगरसेवक महापालिकेत असून भगवान भालेराव यांच्याकडे उपमहापौरपद आहे. भगवान भालेराव यांच्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे पक्षातील दुखावलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
 

Web Title: Possibility of vertical split in Ripai in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.