कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 13 नगरसेवकांचे पद रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:57 PM2020-07-30T20:57:43+5:302020-07-30T20:57:56+5:30
महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकिकडे घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 13 नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने यासंदर्भात सादर केलेल्या अहवालावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे.
केडीएमसीतील 27 गावांमधील 18 गावे राज्य सरकारकडून वगळण्यात आली आहेत. यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे. तर, आजदे, सागाव, नांदीवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा ही गावे केडीएमसीत ठेवली आहेत. केडीएमसीतील नगरसेवकांचे सदस्यत्व 11 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.
दरम्यान 27 गावातील 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा असा अहवाल महापालिकेच्या निवडणूक विभागाने सूर्यवंशी यांना पाठविला होता. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहीरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे या 13 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.नगरसेवकपद रद्द करण्याच्या कार्यवाहीवर संबंधित नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.