नगरसेविका साजिदाबानो यांचे पद धोक्यात?, तीन अपत्य: माहेरच्या नावाने लढवली होती निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:39 AM2017-11-29T06:39:24+5:302017-11-29T06:39:37+5:30
तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर
भिवंडी : तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील गौरीपाडा खजूरपुरा या परिसरातील प्रभाग क्र. ७ अ मधून साजिदाबानो इश्तियाक मोमीन या निवडून आल्या आहेत. हे त्यांचे माहेरचे नाव आहे. म्हणून त्यांचा आपत्यांचा उल्लेख झालेला नाही. यापूर्वी याच महिलेने २०१२ च्या महापालिका निवडणुकीत याच परिसरातील प्रभागातून आपल्या पतीच्या नावे म्हणजे अन्सारी साजिदा रईस या नावाने नामनिर्देशनपत्र भरले होते. मात्र त्यांना दोन पेक्षा जास्त मुले असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद झाले होते. असे असताना त्यांनी २०१७ मध्ये आपल्या वडिलांचे नाव लावून माहेरच्या नावाने नामनिर्देशन अर्ज भरला आणि स्वत:ची माहिती लपवून निवडणूक विभागाची फसवणूक केली,असा आरोप माजी नगरसेवक अनिस खलील मोमीन यांनी केला.तसेच या बाबतची सर्व पुरव्याची कागदपत्रे देऊन अनिस मोमीन यांनी नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोग व पालिका आयुक्तांकडे केली आहे.
या बाबत राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ. गो.जाधव यांनी नामनिर्देशना सोबत उमेदवाराने द्यायच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास त्याची चौकशी करून कारवाई करावी,असे आदेश पालिका आयुक्त योगेश म्हसे यांना दिले. या बाबत पालिका आयुक्त म्हसे यांनी ३ नोव्हेंबरला सुनावणी घेतली असून येत्या दोन दिवसात दुसरी सुनावणी आयुक्त घेणार आहे. त्यामुळे साजेदाबाने इश्तियाक मोमीन यांच्या नगरसेविका पदावर टांगती तलवार आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अर्शद मोहम्मद अस्लम अन्सारी यांचा जातीचा दाखल जातपडताळणी विभागाने रद्द केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता साजीदाबानो इश्तियाक मोमीन यांच्या बाबत आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.