पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर लवकरच उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:14 AM2020-09-25T00:14:46+5:302020-09-25T00:14:55+5:30
विजय सूर्यवंशी : केडीएमसी, आयएमएचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी, आयएमएची कल्याण व डोंबिवली शाखा यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर लवकरच उभारण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी सायंकाळी दिली. कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात कल्याण-डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाला, तरी कित्येक वेळा त्याच्या फुफफुसांमध्ये इन्फेक्शन राहते. त्यामुळे अशा रुग्णांना नंतरही बाहेरून आॅक्सिजन द्यावा लागतो. काळजी न घेतल्यास त्यांची प्रकृत्ती गंभीर होऊ शकते. अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन सेंटर केडीएमसी उभारणार आहे. अशा कोरोनामुक्त रुग्णांना तेथे ठेवून त्यांच्यावर फिजिओथेरपी व अन्य उपचार केले जातील. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारू शकेल, असे यावेळी सांगण्यात आले.
त्याचबरोबर या विषाणूच्या उपचारासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, या बाबींवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावर ताप हे केवळ कोरोनाचे लक्षण नाही.
अशक्तपणा, जुलाब अशी अनेक लक्षणे कोरोनामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी केली पाहिजे, असा मुद्दा डॉक्टरांनी मांडला. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी (नातेवाईक, हायरिस्क पेशंट) कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होईल. तसेच चाचण्यांची वेळ वाढवल्यास अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल, असा मुद्दा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मांडला. त्यावर मनपा चाचण्यांची वेळ सायंकाळी ४ ते ५ पर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. एन.ए.बी.एल.ची मान्यता असलेल्या खाजगी लॅबने मनपाकडे विचारणा केल्यास त्यांनाही अॅण्टीजेन टेस्टसाठी परवानगी मिळवून देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, या बैठकीला टास्क फोर्स टीमच्या वतीने विक्रम जैन, डॉ. राजेंद्र केसरवानी, डॉ. अमित सिंग, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अर्चना पाटे, डॉ. प्रशांत पाटील आणि केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समीर सरवणकर, डॉ. विनोद दौंड यावेळी आदी उपस्थित होते.
‘तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे’
टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मनपाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांना मार्गदर्शन करावे, तसेच या केंद्रांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांना सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केली.