टपाल कार्यालय झाले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:36 AM2019-03-02T01:36:04+5:302019-03-02T01:36:16+5:30
भाड्याच्या जागेतून कारभार : कर्मचारी भीतीच्या छायेत
मीरा रोड : गेली ३२ वर्षे भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या जागेत टपाल कार्यालय सुरू आहे. पण, काही वर्षांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत हे कार्यालय असून कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत धरून वावरतात. शहरात टपाल कार्यालयासाठी असणारी चार आरक्षणे विकसित केली जात नसताना दुसरीकडे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णयही अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे.
भार्इंदर पूर्वेला बाळाराम पाटील मार्गावर असलेल्या श्रीगणेश कृपा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १९८६ पासून भाड्याने टपाल कार्यालय सुरू आहे. सुरुवातीला असलेल्या १० टपाल कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आज ४५ च्या घरात पोहोचली आहे. पण, कामाचा वाढलेला पसारा पाहता, आहे ते कर्मचारीही अपुरे पडत आहेत. टपाल कार्यालय सुरू होऊन ३२ वर्षे झाली, तरी या कार्यालयाची अंतर्गत दुरुस्ती झाली नाही. शिवाय, इमारतही धोकादायक झाली आहे. कार्यालयातील छताचे व भिंतीचे प्लास्टर कोसळले असून आतील सळया बाहेर आल्या आहेत. कॉलम व बिमना तडे गेले आहेत. २००६ मध्ये तर मनोजकुमार पांडे नावाचा कर्मचारी स्लॅब कोसळून जखमी झाला होता. एरव्ही, किरकोळ अपघात घडतच असतात.
खासदार राजन विचारे यांनीही ठाणे, नवी मुंबई, भार्इंदरच्या टपाल कार्यालयाबद्दल मुख्य जनरल पोस्टमास्तर एस.सी. अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले होते. भार्इंदरचे टपाल कार्यालय लवकरच सुरक्षित जागेत हलवण्यात येईल, असे त्यावेळी विचारे म्हणाले होते. मनसेच्या महिला पदाधिकारी अनू पाटील यांनी टपाल कार्यालयाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या.
माहिती अधिकारात त्यांना पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी शहरात चार आरक्षणे टपाल कार्यालयासाठी असल्याचे कळवत ती त्या विभागाने ताब्यात घेऊन विकसित केली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
समस्यांबाबत वरिष्ठांना कळवले आहे
पोस्टमास्तर एन.आर. खैरनार यांनी सांगितले की, कार्यालयातील अवस्था, अपुरी जागा याबद्दल वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत समिती काम पाहत असून कार्यालय दुसºया भाड्याच्या जागेत हलवण्यासाठी दोन प्रस्ताव आले आहेत. लवकरच टपाल कार्यालय नवीन प्रशस्त जागेत स्थलांतरित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.