रिक्षा चालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 08:37 PM2021-06-16T20:37:49+5:302021-06-16T20:40:39+5:30
आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वातही झाली आहे. मात्र, उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची बाब समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८४ हजार ४५६ परमिटधारक रिक्षा चालकांपैकी केवळ २३ हजार ३०६ रिक्षाचालकांनी दीड हजार रु पयांच्या अनुदानासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अर्ज केला आहे. ज्यांना बँक खात्याची समस्या असेल त्यांना न्यूनतम ठेव नसतांनाही खाते उघडण्याची संधी आता भारतीय डाक विभागाने दिली आहे. याचा अनेक रिक्षा चालकांना फायदा होणार असल्याची माहिती ठाणे आरटीओने दिली.
आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वातही झाली आहे. मात्र, उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची बाब समोर आली. कोरोना काळातील लॉकडाऊन सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ठाणे विभागात ८४ हजार ४५६ पैकी २३ हजार ३०६ परमीटधारक रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. त्यातील १७ हजार मंजूर झाले असून सात हजार चालकांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.
उर्वरित काही रिक्षा चालकांना आधारकार्ड तसेच बँक खात्याची समस्या आहे. त्यामुळे आरटीओने यापूर्वीच दोन आधार केंद्र सुरु केले. आता १६ जून पासून भारतीय डाक कार्यालयाच्या मदतीने आरटीओ ठाणे कार्यालयाच्या आवारात रिक्षा चालकांसाठी खास बँक खाते सुरु करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे आणि जयंत पाटील यांनी डाक कार्यालयात तशी मागणी केल्यानंतर डाक कार्यालयाने ही मागणी मान्य करुन आरटीओ कार्यालयाच्या आवारातच पोस्टाचेही केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बँकेची सुविधा नव्हती. त्यांचाही या अनुदानासाठी मार्ग आता मोकळा झाला आहे.