उल्हासनगरात भाजप-शिवसेनेचे पोंस्टर्स युद्ध, ५० कुठे व १०५ कुठेचा पोस्टर्स रात्रीत चोरीला
By सदानंद नाईक | Published: June 15, 2023 05:31 PM2023-06-15T17:31:23+5:302023-06-15T17:32:20+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन विभागात सुरवातीला शिवसेना शिंदेगटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी त्यांची आई व माजी महापौर लिलाबाई अशान यांच्या सोबत हमारा नेता, हमारा अभिमान असे पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगर : भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी फडणविसच किंगमेकर, कुठे ५० व कुठे १०५ असे पोस्टर्स बुधवारी लावून शिवसेनेच्या पोस्टर्सला प्रतिउत्तर दिले. मात्र रात्रीतून पोस्टर्स चोरीला गेले. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांना गुरवारी पत्रकार परिषद घेऊन, भाजप व शिवसेना शिंदेगट साथसाथ असल्याचे सांगावे लागले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन विभागात सुरवातीला शिवसेना शिंदेगटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी त्यांची आई व माजी महापौर लिलाबाई अशान यांच्या सोबत हमारा नेता, हमारा अभिमान असे पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. ठाणे, कल्याण येथील वाद उल्हासनगरला पोहोचल्यावर आमदार गणपत गायकवाड, विभागप्रमुख निलेश बोबडे यांनी यापोस्टर्सवरून नाराजी व्यक्त करीत, असे पोस्टर्स आमच्या नेत्यांचे लावू शकतो. असा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोस्टर्सच्या जागी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स झळकून, त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांचे फोटो झळकले. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी व कपिल अडसूळ यांनी शिवसेनेच्या पोस्टर्सवर नाराजी व्यक्त करीत शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते.
कॅम्प नं-३ परिसरात फडणवीसच किंगमेकर, कुठे ५० व १०५ कुठे? असे पोस्टर्स माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी व कपिल अडसूळ यांनी स्वतःच्या फोटो व नावानिशी झळकळून शिवसेना शिंदे गटाला डीचवून आम्हालाजी पोस्टर्सबाजी करता येते. असा इशारा रामचंदानी यांनी शिवसेनेचे अरुण अशान यांना दिला. या पोस्टर्सने खळबळ उडून भाजप व शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान रामचंदानी व अडसूळ यांनी लावलेले पोस्टर्स रात्रीत गायब चोरीला गेले. यावर आरोप-प्रत्यारोप होत असतांना, गुरवारी दुपारी आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना व भाजप पदाधिकार्याची बैठक घेऊन, दोन्हीं पक्षातील नेते व पदाधिकार्यांनी एकमेका विरोधात आरोप-प्रत्यारोप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आयलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप-शिवसेना महायुती सत्तेत असून एकत्र काम करीत असल्याचे सांगितले. यापुढे एकमेका विरोधात असे पोस्टर्स युद्ध रंगणार नसल्याचे सांगावे लागले.
भाजपची आक्रमक भूमिका?
शहरात व महापालिकेत सुरवातीपासून शिवसेनेचा दबदबा राहिला असून भाजप लहान भावाच्या भूमिकेत राहिला आहे. अपवाद गेल्या महापालिका निवडणुकीचा आहे. शिवसेने ऐवजी भाजपने कलानी यांच्यासोबत युती केली होती. मात्र पोस्टर्सबाजीत आक्रमक भूमिका घेतल्याने, भाजप वरचढ ठरली आहे.