महागाईविरोधात राष्ट्रवादीने लावली पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:23+5:302021-03-15T04:36:23+5:30
उल्हासनगर : जीवनावश्यक वस्तूंसह गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी पक्षाने विविध ठिकाणी पोस्टर लावली आहेत. सभागृहनेते ...
उल्हासनगर : जीवनावश्यक वस्तूंसह गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी पक्षाने विविध ठिकाणी पोस्टर लावली आहेत. सभागृहनेते भरत गंगोत्री यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या असून, हजारो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनलॉक झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी स्थिर ठेवायला हवे होते. मात्र तसे न होता गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईमध्ये भरडला जात असताना मोदी सरकारने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप गंगोत्री, शहराध्यक्ष हरकिरण कौर धामी, नगरसेवक सुनीता बगाडे आदींनी केला आहे. नागरिकांत जनजागृती करण्यासाठी व मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्याकरिता शहरातील विविध ठिकाणी पोस्टर लावली आहेत अशी माहिती पक्षाचे माधव बगाडे, विशाल गंगोत्री यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या दरासह पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर कमी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन सुरू ठेवण्याचा मानस गंगोत्री यांनी व्यक्त केला.